Ravindra Jadeja Wicket Controversy: मँचेस्टरच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात रवींद्र जडेजाला बाद करण्यासाठी हॅरी ब्रुकने दुसऱ्या स्लीपमध्ये भन्नाट झेल घेतला. हा झेल घेतल्यानंतर त्याचं जोरदार कौतुक होत आहे. त्याने झेल पकडताच जडेजाने पॅव्हेलियनची वाट धरली. त्याने हा झेल योग्यरित्या पकडला आहे की नाही, हे तिसऱ्या पंचांनी तपासून पाहिलं नाही. त्यामुळे सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे.
या सामन्यातील पहिल्या दिवसाअखेर भारतीय संघाला २६४ धावा करता आल्या. दुसऱ्या दिवशी भारतीय संघाकडून रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूरची जोडी मैदानावर आली. सामना सुरू होताच, हॅरी ब्रुकने जडेजाचा भन्नाट झेल घेतला. या झेलमुळे जडेजाचा डाव ४० चेंडूत २० धावांवर आटोपला. पण तिसऱ्या पंचांनी हा झेल तपासून पाहिला नाही.
तर झाले असे की, दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर भारतीय संघाकडून रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूरची जोडी मैदानावर आली. इंग्लंडकडून ख्रिस वोक्स पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. त्यानंतर जोफ्रा आर्चर दुसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. जोफ्रा आर्चरच्या ८५ व्या षटकातील पाचवा चेंडू टप्पा पडून बाहेर गेला. हा चेंडू जडेजाने डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटची कडा घेऊन दुसऱ्या स्लीपमध्ये असलेल्या हॅरी ब्रुकच्या हातात गेला. हॅरी ब्रुकने कुठलीही चूक न करता डाईव्ह मारत सोपा झेल घेतला.
रवींद्र जडेजा बाद होता का?
रवींद्र जडेजाचं मैदानावर टिकून राहणं किती महत्वाचं आहे, हे आपण गेल्या २ कसोटी सामन्यात पाहिलं आहे. या सामन्यातही ऋषभ पंत दुखापतग्रस्त असताना रवींद्र जडेजाचं खेळपट्टीवर टिकून राहणं खूप महत्वाचं होतं. जोफ्रा आर्चरचा वेगवान चेंडू टप्पा पडून बाहेर गेला. हॅरी ब्रुकने शानदार झेल पकडला. पण हा झेल त्याच्या हातात जाण्यापूर्वी चेंडू आणि जमिनीचा संपर्क झाला होता, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.सोशल मीडियावर काही फोटो जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात चेंडू आणि जमिनीचा संपर्क झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे जडेजा नाबाद होता आणि पंचांनी एकदा तपासून घ्यायला हवं होतं असं अनेकांचं म्हणणं आहे.