आयपीएल २०२५ नंतर आता भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत नवख्या भारतीय संघ इंग्लंडला पोहोचला आहे. कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्त्वाखालील संघाने इंग्लंडमध्ये सरावाला सुरूवात केली असून बीसीसीआयने याचा व्हीडिओ शेअर केलाय. दरम्यान भारताच्या कोचिंग स्टाफमध्ये एका नव्या कोचची एन्ट्री झाली आहे.
भारतीय क्रिकेट संघ २० जूनपासून इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. सध्या भारतीय संघ लंडनमधील ट्रेनिंग सेंटरमध्ये आहे. टीम इंडियाने या कसोटी मालिकेसाठी सराव सुरू केला आहे आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्नही करत आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ८ जून (रविवार) रोजी टीम इंडियाच्या प्रशिक्षणाचा व्हिडिओ शेअर केला. यामध्ये खेळाडू सराव करताना दिसत आहेत. भारताचे नवे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच एड्रियन ले रॉक्स देखील व्हिडिओमध्ये आहेत. ले रॉक्सने भारतीय संघात पूर्वीचे कोच सोहम देसाई याची जागा घेतली आहे.
कोण आहेत एड्रियन ले रॉक्स?
एड्रियन ले रॉक्स यांच्या इन्स्टग्राम बायोनुसार, एड्रियन हे एक क्रीडा शास्त्रज्ञ आहेत आणि ते केपटाऊनचे आहेत. ले रॉक्सला सायकलिंग, ट्रायथलॉन सारख्या खेळांमध्ये रस आहे. ले रॉक्स अनेकदा या खेळांमध्ये भाग घेताना दिसतात. ले रॉक्स हे भारताचे पहिले स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक राहिले आहेत. त्यांनी जानेवारी २००२ ते मे २००३ पर्यंत ही जबाबदारी सांभाळली होती.
एड्रियन यांनी सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील तत्कालीन भारतीय संघात एक नवीन फिटनेस संस्कृती आणली. जून २००३ मध्ये ले रॉक्स दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक बनले. ले रॉक्स ऑगस्ट २००७ पर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या संघाबरोबर होते. ले रॉक्स आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होते.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ
शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिमन्यू इश्वरन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा, करूण नायर, वॉशिंग्टन सुंदर, आकाशदीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव