भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान एजबस्टन येथे कसोटी सामना खेळवला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसातील पहिल्या सत्रात भारतीय फलंदाजी ठेपाळली. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ऋषभ पंतने शानदार खेळ करत आपले पाचवे कसोटी शतक झळकावले. जेव्हा उपकर्णधार ऋषभ पंतने शतक पूर्ण केले तेव्हा भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने जल्लोष केला. राहुल द्रविडची ही प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहुल द्रविड अतिशय शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखला जातो. तो फार कमी वेळा प्रतिक्रिया देताना दिसतो. जेव्हा संघ सामने जिंकतो किंवा हरतो तेव्हाही तो शांत दिसतो. पण, पंतच्या शतकानंतर द्रविड आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही. पंतने शतक झळकावल्यानंतर संपूर्ण ड्रेसिंग रूमने उभा राहून टाळ्यांचा कडकडाट केला. यादरम्यान राहुल द्रविडही उभा राहिला आणि दोन्ही हात वर करून त्याने जल्लोष केला.

ऋषभ पंतने रविंद्र जडेजासोबत २२२ धावांची भागीदारी करून भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणले आहे. भारताने पहिल्या दिवशी सात गड्यांच्या मोबदल्यात ३३८ धावा केल्या होत्या. सलामीचे आणि मधल्या फळीतील फलंदाज स्वस्तात माघारी परतले तेव्हा भारताची धावसंख्या पाच बाद ९८ अशी होती. त्यानंतर पंत आणि जडेजाने २३९ चेंडूत २२२ धावा जोडल्या. पंतने १११ चेंडूत २० चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने १४६ धावा केल्या. तर, जडेजा ८३ धावांवर खेळत आहे.

हेही वाचा – IND vs ENG Edgbaston Test: ऋषभ पंत ठरला ‘संकटमोचक’; संयमी शतक करत दिला डावाला आकार

काही दिवसांपूर्वीच मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खराब कामगिरी केल्यामुळे ऋषभ पंतला टीकेचा सामना करावा लागला होता. सध्या सुरू असलेल्या कसोटी सामन्यात मात्र, त्याने संस्मरणीय खेळी केली. त्याने कारकिर्दीतील पाचवे आणि परदेशातील चौथे शतक झळकावले. त्याने केवळ ८९ चेंडूत शतक पूर्ण केले, जे भारतीय यष्टीरक्षकाकडून आलेल्या सर्वात वेगवान कसोटी शतक आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng edgbaston test rahul dravid animated reaction on rishabh pant century goes viral vkk
First published on: 02-07-2022 at 14:21 IST