Ben Stokes Clean Bowled On Jasprit Bumrah Bowling: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. पण, दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी दमदार सुरूवात केली आहे. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने बेन स्टोक्सला बाद करत इंग्लंडला पहिला मोठा धक्का दिला.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सामन्यातील पहिल्या दिवशी इंग्लंडला २५१ धावांपर्यंत मजल मारता आली. पहिल्या दिवसाअखेर जो रूट ९९ तर बेन स्टोक्स ३९ धावांवर माघारी परतला होता. त्यामुळे जो रूटकडे १ धाव करून शतक झळकावण्याची संधी होती. तर दुसरीकडे बेन स्टोक्सला आपलं अर्धशतक पूर्ण करण्याची संधी होती. रूटने बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारत आपलं शतक पूर्ण केलं. पण दुसरीकडे बुमराहने स्टोक्सला दणका देत त्रिफळाचित केलं.
बुमराहच्या भन्नाट बॉलवर स्टोक्सची बत्ती गुल
तर झाले असे की, दुसऱ्या दिवसाच्या सुरूवातीला भारतीय संघाकडून ८६ वे षटक टाकण्यासाठी बुमराह गोलंदाजीला आला. त्यावेळी स्टोक्स ४४ धावांवर फलंदाजी करत होता. बुमराहने टाकलेला दुसरा चेंडू हा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला, जो टप्पा पडताच आत आला आणि ऑफ स्टंप उडवून गेला. हा चेंडू पाहून स्टोक्सलाही आश्चर्याचा धक्का बसला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या भन्नाट चेंडूसह स्टोक्सचा डाव ४४ धावांवर आटोपला.
इंग्लंडला सुरूवातीलाच मोठे धक्के
या सामन्यातील पहिल्या दिवशी इंग्लंडने ४ गडी बाद २५१ धावा केल्या होत्या. पहिल्या दिवशी इंग्लंडचा संघ मजबूत स्थितीत होता. पण दुसऱ्या दिवसाच्या सुरूवातीलाच इंग्लंडला लागोपाठ ३ मोठे धक्के बसले आहेत. जो रूटने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून आपलं शतक पूर्ण केलं. त्यानंतर जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली. बुमराहने आधी बेन स्टोक्सला बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर जो रूट त्रिफळाचित होऊन माघारी परतला. ही जोडी फुटल्यानंतर ख्रिस वोक्सही पहिल्याच चेंडूवर बाद झाला. बुमराहकडे हॅट्रीक पूर्ण करण्याची संधी होती. पण ही संधी थोडक्यात हुकली. लागोपाठ ३ धक्के बसल्यामुळे इंग्लंडचा संघ पिछाडीवर आहे.