Shubman Gill Century and Record Sachin Tendulkar: भारताचा नवा कर्णधार शुबमन गिलची बॅट इंग्लंडविरूद्ध चांगलीच तळपताना दिसत आहे. गिलने इंग्लंडविरूद्ध आतापर्यंत ४ शतकं झळकावली आहेत आणि अनेक दिग्गज खेळाडूंचे विक्रम मोडले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात शुबमन गिलने शतक झळकावलंय. यासह तो या मैदानावर शतक करणारा ९वा भारतीय खेळाडू आहे.
२५ वर्षीय शुबमन गिलने २२८ चेंडूत १२ चौकारांसह आपलं शतक पूर्ण केलं. यासह गिलने कसोटीत आतापर्यंत ९ शतकं केली आहेत. इंग्लंडने भारतीय संघावर ३११ धावांची आघाडी घेतली होती. भारताची सुरूवात खातं न उघडता २ विकेट अशी झाली होती. यानंतर गिल आणि राहुलने संघाचा डाव सावरला आणि दोघांनी चांगली भागीदारी रचली. पण पाचव्या दिवशी बेन स्टोक्सने राहुलला बाद करत ही भागीदारी तोडली.
राहुल बाद झाल्यानंतर गिलने सुंदरच्या मदतीने संघाचा डाव सांभाळला आणि शतक झळकावलं. गिल शतकाकडे वाटचाल करत होता पण यादरम्यान स्टोक्सचा उसळता चेंडू त्याच्या हाताला आणि हेल्मेटला लागल्याने कळवळताना दिसला. सामना काही काळ थांबला पण गिलने हार मानली नाही आणि नंतर त्याचे शतक पूर्ण केले. गिलने त्याच्या शतकी खेळीदरम्यान स्वतःवर खूप नियंत्रण ठेवत शानदार फटके खेळले.
गिल हा मँचेस्टरमध्ये सचिन तेंडुलकरनंतर ३५ वर्षांत शतक करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकरने १९९० मध्ये या मैदानावर शतक झळकावलं होतं. त्यानंतर गेल्या ३५ वर्षांत कोणताच फलंदाज ही कामगिरी करू शकला नाही. आता गिलने ही कामगिरी केली आहे. यापूर्वी १९९० मध्ये मोहम्मद अझरुद्दीनने कर्णधार म्हणून याच मैदानावर शतक झळकावलं होतं.
शुबमन गिलने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही केला. त्याच्या आधी यशस्वी जैस्वालने २०२४ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ७१२ धावा केल्या होत्या. गिलने आता त्याला मागे टाकलं आहे.
एकाच कसोटी मालिकेत ४ शतकं करणारा तिसरा फलंदाज
एकाच कसोटी मालिकेत ४ शतकं करणारा गिल सुनील गावस्कर आणि डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर तिसरा कर्णधार बनला आहे. एका मालिकेत सर्वाधिक शतकं करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आता गावस्कर आणि विराट कोहली यांच्यासह सामील झाला आहे.
गिलने रोहित शर्माच्या विक्रमाची केली बरोबरी
शुबमन गिलने रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे. रोहितने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये एकूण ९ शतकं झळकावली आहेत. गिलने ९ शतके झळकावून त्याची बरोबरी केली आहे. २३८ चेंडूत १०३ धावांची खेळी खेळल्यानंतर गिल आर्चरच्या गोलंदाजीवर बाद झाला.