न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने शानदार गोलंदाजी केली. त्याने पहिल्याच षटकात डॅरिल मिशेलला स्विंग गोलंदाजीवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भुवीने टाकलेला हा चेंडू इतका अचंबित करणारा होता की गोलंदाज मिचेलला तो कळलाच नाही. मागील काही काळापासून भारतीय चाहत्यांना भुवीची ही स्विंग गोलंदाजी पाहता आली नव्हती. मात्र पहिल्याच सामन्यात भुवीने धोकादायक गोलंदाजी करत चाहत्यांची मने जिंकली. बीसीसीआयनेही त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

टी-२० विश्वचषकात भुवीला पाकिस्तानविरुद्ध फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर एकाही सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. मात्र जयपूरच्या खेळपट्टीवर भुवीने आपली स्विंग गोलंदाजी दाखवून दाखवून दिले आहे की, त्याच्यात अजून बरेच क्रिकेट शिल्लक आहे. मिशेलने टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध जबरदस्त फलंदाजी केली होती. त्याच्या खेळीमुळे न्यूझीलंडला फायनलमध्ये पोहोचता आले.

या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १६४ धावा केल्या. मार्टिन गप्टिलने न्यूझीलंडकडून ७० धावा केल्या आणि भारतीय गोलंदाजांविरुद्ध जोरदार फटकेबाजी केली. गप्टिलने ४२ चेंडूंचा सामना करताना ६ षटकार आणि ३ चौकार मारले. गप्टिलशिवाय मार्क चॅपमनने ६३ धावा केल्या. या दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी १०९ धावांची भागीदारी केली. भारताकडून अश्विन आणि भुवीने प्रत्येकी २ विकेट घेतल्या, तर मोहम्मद सिराज आणि दीपक चहर यांनी १-१ विकेट घेतली.

हेही वाचा – ‘‘ये इंडिया का नया कप्तान टॉस भी जितेगा और…”, ट्विटरवर रोहितच्याच नावाचा जयजयकार!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रत्युत्तरात मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवने अर्धशतक ठोकले तर, रोहितने ४८ धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात १० धावांची गरज असताना पदार्पणवीर व्यंकटेश अय्यर आणि ऋषभ पंत यांनी चौकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सूर्यकुमारला सामनावीर पुरस्कार मिळाला. या विजयासह भारताने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. हा सामना जयपूर ते सवाई मानसिंग असा खेळला गेला. येथे प्रथमच टी-२० आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्यात आला होता.