सध्या भारत आणि न्यूझीलंड संघात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दुसऱ्या टी-20मध्ये न्यूझीलंडचा पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर तिसरा सामना २२ तारखेला होणार आहे. मालिकेत पिछाडीवर पडल्यानंतर आता न्यूझीलंडला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कर्णधार केन विल्यमसन तिसऱ्या टी-२० मधून बाहेर झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केन विल्यमसन वैद्यकीय कारणांमुळे तिसऱ्या टी-२० सामन्यात खेळू शकणार नाही. हा सामना २२ नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी १२:०० वाजता नेपियर येथे सुरु होणार आहे.
अगोदर घेतलेल्या वैद्यकीय अपॉइंटमेंटमुळे विल्यमसन तिसऱ्या टी-२०मध्ये खेळणार नाही. त्याच्या जागी वरिष्ठ वेगवान गोलंदाज टीम साऊथी न्यूझीलंड संघाची जबाबदारी सांभाळणार आहे. त्याचवेळी डावखुरा स्फोटक फलंदाज मार्क चॅपमन संघात परतला आहे. तिसऱ्या टी-२०मध्ये त्याला संधी मिळू शकते. विल्यमसनची अनुपस्थिती न्यूझीलंडसाठी एक धक्का आहे. कारण तो भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मध्ये किवीसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.
न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले की, विल्यमसनच्या वैद्यकीय अपॉइंटमेंटचा आणि त्याच्या कोपराच्या समस्येशी काहीही संबंध नाही. ३२ वर्षीय विल्यमसन वनडे मालिकेपूर्वी संघात सामील होणार आहे. टी-20 मालिकेनंतर न्यूझीलंड संघ भारताविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिकाही खेळणार आहे. पहिला एकदिवसीय सामना शुक्रवारी ऑकलंडमध्ये होणार आहे. वनडे मालिकेत भारताचा कर्णधार शिखर धवन असेल. त्याचबरोबर युवा खेळाडूंना सोबत घेऊन टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. या दौऱ्यावर रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह इतर काही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना माऊंट मौनगानुई येथे खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकात ६ गडी गमावून १९१ धावा केल्या. टीम इंडियासाठी सूर्यकुमार यादवने ५१ चेंडूत १११ धावांची नाबाद खेळी खेळली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ १८.५ षटकांत सर्वबाद १२६ धावांवर आटोपला. कर्णधार विल्यमसनने सर्वाधिक ६५ धावा केल्या. भारताने हा सामना ६५ धावांनी जिंकला. या सामन्यात साऊथीने हॅट्ट्रिकही घेतली. त्याने सलग तीन चेंडूंवर हार्दिक पांड्या, दीपक हुडा आणि वॉशिंग्टन सुंदरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.