Asia Cup 2025 IND vs OMAN Live Streaming: आशिया चषक २०२५ आता सुपर फोरच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाने स्पर्धेत आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारतीय संघाने सलग दोन्ही सामने जिंकत सुपर फोरमध्ये धडक मारली आहे. आता भारतीय संघ गट टप्प्यातील अखेरचा सामना ओमानविरूद्ध खेळणार आहे. हा सामना दुबई नाही तर कुठे खेळवला जाणार आणि सामना लाईव्ह कुठे पाहता येणार, जाणून घेऊया.

टीम इंडियाने आपल्या मोहिमेची सुरुवात युएईविरूद्ध ९ विकेट्सने विजय मिळवून केली. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानचा ७ विकेट्सने सहज पराभव केला. आता, टीम इंडिया त्यांचा शेवटचा गट टप्प्यातील सामना ओमानविरुद्ध खेळणार आहे. ओमानचा संघ सुरूवातीचे दोन सामने जिंकत आधीच स्पर्धेबाहेर झाला आहे. या सामन्यात भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

भारत आणि ओमान यांच्यातील गट टप्प्यातील अखेरचा सामना १९ सप्टेंबर शुक्रवारी खेळवला जाणार आहे. भारताने स्पर्धेतील सुरूवातीचे दोन्ही सामने दुबई क्रिकेट स्टेडियममध्ये खेळले. पण ओमानविरूद्धचा भारताचा सामना अबूधाबीच्या शेख जायद स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ८ वाजता सुरू होईल, तर संध्याकाळी ७.३० वाजता सामन्याची नाणेफेक होईल.

भारत आणि ओमान यांच्यातील हा सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्क या चॅनेलवर लाईव्ह पाहू शकतात. तर सोनी लिव्ह अॅप आणि वेबसाईटवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग होईल.

अबू धाबी स्टेडियममध्ये भारतीय संघाचा रेकॉर्ड चांगला आहे. खरं तर, टीम इंडियाने आतापर्यंत या मैदानावर फक्त एकच टी-२० सामना खेळला आहे. हा सामना २०२१ च्या टी२० विश्वचषकादरम्यान खेळला गेला होता, जेव्हा टीम इंडियाचा सामना अफगाणिस्तानशी झाला होता. टीम इंडियाने तो सामना ६६ धावांनी जिंकला होता.

ओमानविरूद्धचा सामना हा टीम इंडियासाठी खास असणार आहे. ते त्यांचा २५० वा टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहेत. २५० टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा भारतीय संघ हा पाकिस्ताननंतरचा दुसरा संघ बनेल.

आशिया चषकासाठी भारत आणि ओमानचे संपूर्ण संघ

भारताचा संघ :

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंह

ओमानचा संघ

जतिंदर सिंग (कर्णधार), हम्माद मिर्झा, विनायक शुक्ला, सुफयान युसूफ, आशिष ओडेदेरा, आमिर कलीम, मोहम्मद नदीम, सुफयान महमूद, आर्यन बिश्त, करण सोनावळे, जिक्रिया इस्लाम, हसनैन अली शाह, फैसल शाह, मोहम्मद इम्रान, नदीम खान, शकील अहमद, समय श्रीवास्तव