Asia Cup 2025 IND vs PAK Final Jasprit Bumrah Talks: आशिया चषक इतिहासात ४१ वर्षांत पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानचे संघ अंतिम सामन्यात भिडणार आहेत. भारत आणि पाकिस्तानचे संघ यापूर्वी अनेकदा अंतिम सामन्यांमध्ये एकमेकांविरूद्ध भिडले आहेत. पण आशिया चषक इतिहासात मात्र ही लढत प्रथमच पाहायला मिळणार आहे. भारत-पाक अंतिम सामन्यादरम्यान बुमराहच्या नो बॉलची चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहे, यामागे काय कारण आहे; जाणून घेऊया.

भारत आणि पाकिस्तानचे संघ आतापर्यंत पाच वेळा अंतिम सामन्यात आमनेसामने आले आहेत. पाच किंवा त्यापेक्षा अधिक संघ असलेल्या स्पर्धेतील ही आकडेवारी आहे. पाच सामन्यांपैकी भारतीय संघाने केवळ दोन सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानच्या संघाचा तीनवेळा विजय झालेला आहे. यामध्ये भारताने टी-२० विश्वचषक २००७ मध्ये पकिस्तानवर प्रसिद्ध विजय मिळवला होता.

२००७ मधील भारताच्या विजयासह २०१७ मधील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील पराभव ही चाहत्यांच्या डोक्यात कायम आहे. भारत-पाकिस्तानमध्ये २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर कोणताच अंतिम सामना खेळवला गेलेला नाही. यादरम्यान अंतिम सामन्यात बुमराहचा एक नो बॉल संघाला चांगलाची भारी पडला होता. यावरूनच चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

१८ जून २०१७ रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने टीम इंडियाचा १८० धावांनी पराभव केला होता. भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी हा दिवस एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हता. या पराभवासाठी भारतीय फलंदाज मोठ्या प्रमाणात जबाबदार असले तरी, जसप्रीत बुमराहलाही या पराभवासाठी जबाबदार धरण्यात आलं होतं. बुमराहचा सामन्यातील तो एक नो बॉल संघाला चांगलाच भारी पडला होता.

सामन्याच्या चौथ्या षटकात जसप्रीत बुमराहने नो-बॉल टाकला होता. हा नो-बॉल भारतासाठी खूप महागडा ठरला. पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमान बुमराहच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. पण तिसऱ्या पंचांनी टीव्ही रिप्लेमध्ये पाहिलं की बुमराहचा पाय रेषेच्या बाहेर होता आणि त्यामुळे फखर जमानला जीवनदान मिळालं.

जीवदान मिळाल्यानंतर फखर जमानने १२ चौकार आणि तीन षटकारांसह ११४ धावा केल्या. जमान आणि अझर अली यांनी १२८ धावांची सलामी भागीदारी केली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने फखर जमानच्या शतकाच्या जोरावर भारतासमोर ३३९ धावांचे लक्ष्य ठेवले. अझहर अली ५९, बाबर आझम ४६ आणि मोहम्मद हाफिज ५७ धावा केल्या.

३३९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, भारताचे फलंदाजी वाईटरित्या अपयशी ठरले आणि संघ फक्त १५८ धावांवर सर्वबाद झाला. हार्दिक पंड्या ७६ धावा करणारा एकमेव भारतीय फलंदाज होता. पांड्याने ४३ चेंडूत ७६ धावांची धमाकेदार खेळी केली. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिर आणि हसन अली यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.