पीटीआय, दुबई
आशिया चषक स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक पूर्ण केल्यानंतर पाकिस्तानचा सलामीवीर साहिबझादा फरहानने बॅटचा बंदुकीसारखा वापर करून हवेत गोळ्या झाडण्याची कृती केली. यामुळे मोठा वाद निर्माण झाला. मात्र, याने साहिबझादाला जराही फरक पडला नसून लोकांच्या मताची मी पर्वा करत नाही, असे वक्तव्य त्याने केले आहे.

‘‘एरवी मी फारसा जल्लोष करत नाही. परंतु यावेळी अर्धशतक पूर्ण झाल्यावर मला ही कृती करावीशी वाटली आणि मी ती केली. लोक त्याकडे कशा पद्धतीने पाहतात ते माझ्या हातात नाही. खरे सांगायचे तर मला त्याने फरकही पडत नाही. लोकांच्या मताची मला पर्वा नाही,’’ असे साहिबझादाने पत्रकारांना सांगितले. ‘‘आमचा आक्रमक शैलीतच खेळण्याचा प्रयत्न असतो. समोर भारत आहे किंवा अन्य एखादा संघ, याने आम्हाला फरक पडत नाही. आम्ही या सामन्यात भारताविरुद्ध जसे खेळलो, तसेच अन्य संघांविरुद्धही खेळू,’’ असेही साहिबझादा म्हणाला.

आशिया चषकातील ‘अव्वल चार’ फेरीच्या सामन्यात पाकिस्तानला भारताकडून हार पत्करावी लागली. साहिबझादाला शून्यावरच जीवदान मिळाले आणि या संधीचा फायदा घेताना त्याने ४५ चेंडूंत ५८ धावांची खेळी साकारली. त्याने पाकिस्तानच्या डावातील १०व्या षटकात अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने आपली बॅट एखाद्या बंदुकीसारखी पकडली आणि हवेत गोळ्या झाडण्याची कृती केली. त्याच्या या कृतीची समाजमाध्यमांवर बरीच चर्चा रंगली. त्याने भारतीयांच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न केल्याचेही म्हटले गेले. तसेच भारतातील राजकीय पक्षांकडूनही साहिबझादावर ताशेरे ओढण्यात आले.