Mike Hesson On India vs Pakistan Match: आशिया चषक २०२५ स्पर्धेत इतिहास घडणार आहे. स्पर्धेतील १७ हंगाम आणि ४१ वर्ष पूर्ण झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. याआधी दोन्ही संघ कधीच आशिया चषकातील अंतिम फेरीत एकमेकांसमोर आले नव्हते. हा सामना २८ सप्टेंबरला दुबईतील दुबई क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. भारतीय संघाने या स्पर्धेतील एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे भारतीय संघ स्पर्धेतील सर्व सामने जिंकून जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचा संघ भारतीय संघाला पराभूत करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
भारतीय संघाने बुधवारी झालेल्या सामन्यात बांगलादेशवर विजय मिळवत अंतिम फेरीत स्थान मिळवलं होतं. तर गुरूवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशला धूळ चारत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं आहे. दरम्यान भारत- पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्याआधी पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
भारतासारख्या बलाढ्य संघाला पराभूत करायचा असेल, तर पूर्ण जोर लावावा लागणार आहे असं माइक हेसन यांनी म्हटलं आहे. अंतिम फेरीत स्थान मिळवल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना माइक हेसन म्हणाले, “आम्हाला भारतीय संघावर दबाव टाकावा लागेल. गेल्या सामन्यात आम्ही मजबूत स्थितीत होतो, पण अभिषेक शर्माने केलेल्या दमदार कामगिरीमुळे आम्ही बॅकफूटवर गेलो. आमचा संघ या अंतिम सामन्याचा पूर्ण हकदार आहे आणि आम्ही ट्रॉफी जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावू.”
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ या स्पर्धेत २ वेळेस आमनेसामने आले होते. या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानवर एकतर्फी विजयाची नोंद केली होती. साखळी फेरीत झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ६ गडी राखून विजयाची नोंद केली होती. तर सुपर ४ फेरीतील सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला होता. आता दोन्ही संघ अंतिम फेरीत तिसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. भारतीय संघ या स्पर्धेत पाकिस्तानला तिसऱ्यांदा पराभूत करून जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्याच्या प्रयत्नात असणार आहे.