IND vs PAK, Sahibzada Farhan Firing Celebration: दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आशिया चषक २०२५ स्पर्धेतील साखळी फेरीतील दुसरा सामना सुरू आहे. या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आमनेसामने आले आहेत. याआधी साखळी फेरीत झालेल्या सामन्यात पाकिस्तानला एकतर्फी पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र, या सामन्यात पाकिस्तानने दमदार सुरूवात केली. पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला दोनदा जीवदान मिळालं. या मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन त्याने दमदार अर्धशतक झळकावलं. दरम्यान अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने केलेलं सेलिब्रेशन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
साहिबजादा फरहानचं सेलिब्रेशन चर्चेत
या साामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवून भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना स्वस्तात बाद करण्याची संधी निर्माण करून दिली होती. पण अभिषेक शर्मा आणि कुलदीप यादव यांनी सोपे झेल सोडले. याचा पाकिस्तानच्या फलंदाजांनी चांगलाच फायदा घेतला.
साहिबजादा फरहानने पाकिस्तानला पॉवरप्लेमध्ये दमदार सुरूवात करून दिली. त्याने ३४ चेंडूंचा सामना करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्याने ४५ चेंडूंचा सामना करत ५८ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि ३ षटकार मारले. आपलं अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याने वादग्रस्त सेलिब्रेशन करत मैदानात खळबळ उडवली. फरहाननं मैदानावरच आपल्या बॅटने बंदुकीने गोळीबार करण्यासारखी अॅक्शन केली. या सेलिब्रेशनमुळे त्याला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. आयसीसीने त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सोशल मीडियावरून केली जात आहे.
दोनदा संधी मिळाली अन् अर्धशतक झळकावलं
या सामन्यात तो पाकिस्तानकडून डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानात आला. दोनदा संधी मिळाल्यामुळे त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. पहिल्याच षटकात तो बाद होऊन माघारी परतला असता. पण हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर अभिषेक शर्माने सीमारेषेवर सोपा झेल सोडला. फरहानला बाद करण्याची ही पहिलीच संधी नव्हती. आठव्या षटकात वरूण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर फरहानल बाद करण्याची आणखी एक संधी निर्माण झाली होती. पण पुन्हा एकदा अभिषेक शर्माकडून त्याचा झेल सुटला.