भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा क्रिकेट चाहत्यांना हाय व्हॉल्टेज सामना पाहायला मिळत असतो. साखळी फेरीत झालेल्या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली होती. पण सुपर ४ फेरीतील सामन्यात दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत रंगली. या सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघासमोर विजयासाठी १७२ धावांचं आव्हान ठेवलं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांनी दमदार सुरूवात केली. दोघांनी सलामीला फलंदाजी करताना पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला ५ गडी बाद १७१ धावा करता आल्या. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १७२ धावांची गरज होती. त्यामुळे भारतीय संघाला चांगल्या सुरूवातीची गरज होती. सलामीला आलेल्या अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल या दोघांनी मिळून चौकार आणि षटकांराचा पाऊस पाडत ९ व्या षटकात १०० धावांची भागीदारी पूर्ण केली.

धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्माने शाहिन आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूवर यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून षटकार मारला. हे शाहिन आफ्रिदीला मुळीच आवडलं नाही. पहिल्याच चेंडूवर दोघांमध्ये बाचाबाची पाहायला मिळाली. आफ्रिदीने अभिषेक शर्माला डिवचलं. अभिषेक शर्मानेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. दरम्यान अभिषेकला नडणाऱ्या आफ्रिदीला गिलनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पाकिस्तानने दिलं १७२ धावांचं आव्हान

या सामन्यात पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. पाकिस्तानकडून सलामीला आलेल्या साहिबजादा फरहानने सर्वाधिक ५८ धावांची खेळी केली. तर फखर जमानने १५ धावांची खेळी केली. सईम अयुबने २१, हुसेन तलतने १० , मोहम्मद नवाजने २१ धावांची खेळी केली. शेवटी कर्णधार सलमान अली आगाने नाबाद १७ आणि फहिम अशरफने नाबाद २० धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर पाकिस्तानने ५ गडी बाद १७१ धावा केल्या. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना शिवम दुबेने २ गडी बाद केले. तर हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी १-१ गडी बाद केले.