*  डी कॉक, प्लेसिस आणि डी’व्हिलियर्स यांची शतके  * भारताचा २१४ धावांनी मानहानीकारक पराभव  
* डी कॉक सामनावीर, डी’व्हिलियर्स मालिकावीर
निर्णायक लढतीमध्ये कलात्मक, लालित्यपूर्ण आणि व्यावसायिकतेने नटलेली कामगिरी कशी असावी, याचा उत्तम वस्तुपाठ दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दाखवला. एकीकडे मुंबापुरीवर वरुणराजा प्रसन्न असताना दुसरीकडे वानखेडेवर आफ्रिकेच्या फलंदाजांनी पाऊस पाडला आणि हे चित्र भारतीय चाहत्यांसाठी वेदनादायी होते. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना पूर्णपणे निष्प्रभ करीत नतमस्तक व्हायला भाग पाडले. सुटलेले झेल, दिशाहीन गोलंदाजी आणि दक्षिण आफ्रिकेची सहजपणात प्रवीण असल्याचे दर्शवणारी झंझावाती फलंदाजी, हेच या सामन्याचे वैशिष्टय़ ठरले. आफ्रिकेची फलंदाजी ही अफलातून, अविस्मरणीय, अद्भुत अशीच क्रिकेटप्रेमींना निस्सीम आनंद देणारी होती. त्यामध्ये काही तरी अभूतपूर्व करतोय असा लवलेशही नव्हता. सलामीवीर क्विंटन डी कॉक, फॅफ डू प्लेसिस आणि कर्णधार ए बी डी’व्हिलियर्स यांच्या तडाखेबंद शतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ४३८ धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव २२४ धावांवर आटोपला आणि डी’व्हिलियर्स, डू प्ले्सिस आणि डि कॉक या त्रिकुटाच्या अविश्वसनीय कामगिरीसमोर भारतीय संघ ‘त्रि’फळाचीत झाला. २१४ धावांनी विजयासह दक्षिण आफ्रिकेने ३-२ अशी मालिका जिंकली. भारतातला हा त्यांचा पहिला मालिका विजय ठरला. शतकवीर डी कॉकला सामनावीर आणि डी’व्हिलियर्सला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
दक्षिण आफ्रिकेचा सलामवीर क्विंटन डी कॉकने पहिल्याच षटकात चौकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जलद सहा हजार धावांचा विक्रम रचणाऱ्या हशिम अमलाने (२३) आक्रमक सुरुवात केली खरी, पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पण त्यानंतर डी कॉकने भारतीय गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. ९ चौकारांनिशी डी कॉकने १३ व्या षटकात अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर ५८ धावांवर असताना त्याला जीवदान मिळाले. त्यानंतर डी कॉक भारतीय गोलंदाजांवर तुटून पडला. त्यानंतर प्रत्येक षटकागणिक धावांच्या सरासरीचा आलेख वाढायला सुरुवात झाली. २३ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर एकेरी धाव घेत डी कॉकने कारकीर्दीतील आठवे आणि भारताविरुद्धचे पाचवे शतक पूर्ण केले. शतक झळकावल्यावर मात्र डी कॉक जास्त काळ टिकू शकला नाही. त्याने १७ चौकार आणि एक षटकार लगावत १०९ धावा केल्या.
डी कॉकनंतर गोलंदाजांचा कर्दनदाळ डी’व्हिलियर्स मैदानात दाखल झाला. भारतीय गोलंदाजांनी चेंडूचा टप्पा कुठेही टाकला तरी डी’व्हिलियर्सने त्यांना निरुत्तर केले. नेत्रदीपक फटक्यांचा नजराणा पेश करीत या दोघांनी संघाला ४४ षटकांमध्ये साडेतीनशे धावांचा पल्ला गाठून दिला. फॅफला या वेळी ४५ आणि ८५ धावांवर जीवदान मिळाले आणि त्याचा पुरेपूर फायदा त्याने उचलला. शतकानंतर फॅफला उष्माघातामुळे स्नायूंची दुखापत व्हायला सुरुवात झाली. तरीही मोठे फटके मारण्यात त्याने कसलीच कसर सोडली नाही. अक्षर पटेलच्या ४३ व्या षटकात तर त्याने एक चौकार आणि तीन षटकार लगावले. ४४ व्या षटकात प्रत्येकी एक षटकार आणि चौकार लगावले. पण त्यानंतर अस्वस्थ वाटत असल्याने त्याने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. फॅफने ९ चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर १३३ धावांची खेळी साकारली.
फॅफपेक्षा डी’व्हिलियर्स अधिक आक्रमकपणे गोलंदाजांवर प्रहार करीत होता. त्याची फलंदाजी डोळ्यांचे पारणे फेडणारी आणि संघाच्या बाजूने पारडे झुकवणारी ठरली. त्याच्या जोरकस फटक्यांना तोडच नव्हती. मैदानात स्वैरपणे त्याचे फटके विहार करीत होते. चेंडू आणि सीमारेषा यांच्या अतूट नात्यांची घडी त्याने बसवली. कसलीही तमा न बाळगता तो गोलंदाजांवर तुटून पडला आणि फक्त ६१ चेंडूंमध्ये ११९ धावांची खेळी साकारली. त्यामध्ये ३ चौकार आणि तब्बल ११ गगनभेदी षटकारांचा समावेश होता.
दक्षिण आफ्रिकेच्या धावसंख्येच्या दडपणाचे ओझे भारतीयांना पेलवले नाहीच. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांना चांगली सुरुवात करता आली नाही. शिखर धवन (६०) आणि अजिंक्य रहाणे (८७) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज झटपट माघारी परतले आणि भारताला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला.

भारताचा दुसरा मोठा पराभव
या लढतीत भारताला दुसऱ्या मोठय़ा पराभवाला सामोरे जावे लागले. यापूर्वी भारताला श्रीलंकेकडून २४५ धावांनी पराभव पत्करावा लागला होता.

दुष्काळग्रस्तांसाठी एमसीएची एक कोटीची मदत
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) एक कोटी रुपयांच्या मदतीचा धनादेश भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्याच्या मध्यंतराला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. भारतीय संघातून खेळणारे मुंबईचे क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांच्या हस्ते हा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आला. या वेळी एमसीएचे अध्यक्ष शरद पवार, उपाध्यक्ष दिलीप वेंगसरकर, आशीष शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

धावफलक
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक झे. कोहली गो. रैना १०९, हशिम अमला झे. धोनी. गो. मोहित शर्मा २३, फॅफ डू प्लेसिस जखमी निवृत्त १३३, ए बी डी’व्हिलियर्स झे. धोनी गो. भुवनेश्वर कुमार ११९, डेव्हिड मिलर नाबाद २२, फरहान बेहराडिन झे. रैना गो. हरभजन १६, डीन एल्गार नाबाद ५, अवांतर (लेग बाइज २, वाइड ९) ११, एकूण ५० षटकांत ४ बाद ४३८
बाद क्रम : १-३३, २-१८७, ३-३९८, ४-४३०.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार १०-०-१०६-१, मोहित शर्मा ७-०-८४-१, हरभजन सिंग १०-०-७०-१, अक्षर पटेल ८-०-६५-०, अमित मिश्रा १०-०-७८-०, सुरेश रैना ३-०-१९-१, विराट कोहली २-०-१४-०.
भारत : रोहित शर्मा झे. ताहिर गो. अॅबॉट १६, शिखर धवन झे. अमला गो. रबाडा ६०, विराट कोहली झे. डी कॉक गो. रबाडा ७, अजिंक्य रहाणे झे. बेहराडिन गो. स्टेन ८७, सुरेश रैना त्रि. गो. रबाडा १२, महेंद्रसिंग धोनी त्रि. गो. ताहिर २७, अक्षर पटेल झे. मिलर गो. स्टेन ५, हरभजन सिंग झे. मॉरिस (बदली खेळाडू) गो. स्टेन ०, भुवनेश्वर कुमार झे. मिलर गो. ताहिर १, अमित मिश्रा पायचीत गो. रबाडा ४, मोहित शर्मा नाबाद ०, अवांतर (लेग बाइज १, वाइड ४) ५, एकूण ३५.५ षटकांत सर्व बाद २२४.
बाद क्रम : १-२२, २-४४, ३-१५६, ४-१७२, ५-१८५, ६-१९५, ७-२०१, ८-२१०, ९-२१९, १०-२२४.
गोलंदाजी : डेल स्टेन ७-०-३८-३, कागिसो रबाडा ७-०-४१-४, कायले अॅबॉट ७-०-३९-१, फरहान बेहराडिन ८-०-५५-०, इम्रान ताहिर ७-१-५०-२.
निकाल : दक्षिण आफ्रिका २१४ धावांनी विजयी
मालिका : ३-२ अशी दक्षिण आफ्रिकेने जिंकली
सामनावीर : क्विंटन डी कॉक
मालिकावीर : ए बी डी’व्हिलियर्स

अमलाच्या जलद सहा हजार धावा
दक्षिण आफ्रिकेच्या डावाची दमदार सुरुवात करणाऱ्या हशिम अमलाने जलद सहा हजार धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी कोहलीने १३६ डावांमध्ये सहा हजार धावा केल्या होत्या. अमलाने १२३ व्या डावात हा पराक्रम केला.
**
वानखेडेवरील सर्वोच्च धावसंख्या
दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात वानखेडे स्टेडियमवरील सर्वोच्च धावसंख्येला गवसणी घातली. यापूर्वी २०११ च्या विश्वचषकात वानखेडेवर न्यूझीलंडने कॅनडाविरुद्ध ३५८ धावा केल्या होत्या.
**
एका डावात तीन शतकांच्या विक्रमाशी बरोबरी
एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका डावात तीन शतके झळकावण्याची दक्षिण आफ्रिकेची ही दुसरी वेळ असून त्यांच्याच नावावर हा अनोखा विश्वविक्रम आहे. यापूर्वी १८ जानेवारी २०१५ या दिवशी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून ए बी डी’व्हिलियर्स (१४९), हशिम अमला (१५३) आणि रिली रोसोव (१२८) यांनी शतके झळकावली होती.
**
आफ्रिकेची तिसरी सर्वोच्च धावसंख्या
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या करण्याचा पराक्रम श्रीलंकेने केला होता. त्यांनी नेदरलँड्सविरुद्ध ४४३ धावा केल्या होत्या. त्यानंतर या यादीतील २-४ या क्रमांकांवर दक्षिण आफ्रिकेचेच नाव आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांनी ४३९ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या ४३४ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेने ४३८ धावा केल्या होत्या. त्यानंतर रविवारी याच धावसंख्येची आफ्रिकेने बरोबरी साधली.
मुंबई मसाला
आठवण २००३ च्या विश्वचषक अंतिम फेरीची..
वानखेडेवरील लढतीत दक्षिण आफ्रिकेने धुवाधार फलंदाजी करीत २००३ च्या विश्वचषकातील अंतिम फेरीच्या आठवणी ताज्या केल्या. ऑस्ट्रेलियाने जोहान्सबर्ग येथील अंतिम फेरीत भारतीय गोलंदाजीवर प्रहार करीत ३५९ धावांचा डोंगर उभारला होता. दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्धच्या निर्णायक लढतीत रविवारी ४३८ धावा करण्याची किमया साधली.
**
दिवेचा पॅव्हेलियन रिकामे
मालिकेतील निर्णायक सामना वानखेडेवर होत असताना दिवेचा पॅव्हेलियन मात्र ९० टक्के रिक्तच होते. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) गरवारे क्लबला दिवेचा पॅव्हेलियनची तिकिटे दिली होती. ही तिकिटे सामन्यापूर्वी विक्रीला ठेवण्यात आली होती; परंतु त्याला थंड प्रतिसाद मिळाला होता.
**
एबीडी.. एबीडी..
शतकवीर क्विंटन डी कॉक बाद झाल्यावर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डी’व्हिलियर्स मैदानात येत असतानाच ‘एबीडी.. एबीडी..’ अशा घोषणांनी स्टेडियम निनादले. डी’व्हिलियर्सच्या प्रत्येक फटक्याला प्रेक्षकांकडून दिलखुलास पाठिंबा मिळत होता. दोन वर्षांपूर्वीपर्यंत फक्त सचिनचे असे फलंदाजीसाठी स्वागत केले जायचे.
**
धोनी आला धावून..
अक्षर पटेलच्या ४३ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर फॅफ डू प्लेसिसने लाँग ऑनला षटकार खेचला खरा, पण त्यानंतर लगेचच त्याच्या उजव्या पायाचे स्नायू दुखावले. त्या वेळी यष्टीजवळ असलेला धोनी आपल्या चेन्नई सुपर किंग्जमधल्या सहकाऱ्यासाठी धावून आला. त्याने आफ्रिकेचा फिजिओ मैदानात येईपर्यंत फॅफचे पाय वर धरून ठेवले आणि त्याला दिलासा दिला.
**
अशी ही पाच शतके
या सामन्यात दक्षिण आफ्रिकडून क्विंटन डी कॉक, फॅफ डू प्लेसिस आणि एबी डी’व्हिलियर्स यांनी शतके झळकावली. भारताचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने १० षटकांमध्ये १०६ धावा दिल्या, तर सुरेश रैनाने या सामन्यात आपल्या एकदिवसीय कारकीर्दीतील शंभरावा झेल पकडला.
– प्रसाद मुंबईकर