scorecardresearch

IND vs SL 1st ODI: विराटची सचिनसोबत तुलना केल्याने गंभीरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘सचिन तेंडुलकरने पॉवरप्ले…’

IND vs SL 1st ODI Updates: भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेला ३७४ धावांचे लक्ष्य दिले. विराट कोहली वनडे कारकिर्दीतील ४५ वे शतक झळकावताना भारताकडून सर्वाधिक धावा केल्या.

IND vs SL 1st ODI: विराटची सचिनसोबत तुलना केल्याने गंभीरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘सचिन तेंडुलकरने पॉवरप्ले…’
विराट कोहली आणि गौतम गंभीर (फोटो-संग्रहित छायाचित्र लोकसत्ता)

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ४५ वे शतक झळकावले. विराट कोहली महान सचिन तेंडुलकरच्या वनडे क्रिकेटमधील शतकांच्या विक्रमाच्या अगदी जवळ आला आहे. त्यावरुन काही लोक विराट कोहलीची तुलना क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरशी करत आहेत. यावर आता माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने महत्वाचे विधान केले आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर ४९ एकदिवसीय शतके आहेत, त्यामुळे किंग कोहली लवकरात लवकर सचिन तेंडुलकरचा हा विक्रम मोडेल अशी दाट शक्यता आहे. मात्र, भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्यातील तुलनेबद्दल आपले मत मांडले आहे.

सचिन तेंडुलकरचा काळ पूर्णपणे वेगळा होता –

स्टार स्पोर्ट्सवरील कॉमेंट्रीदरम्यान गौतम गंभीरने स्पष्टपणे आणि सरळपणे सांगितले की, विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरची तुलना होऊ शकत नाही. गौतम गंभीर म्हणाला, ‘सचिन तेंडुलकर कधीही ५ क्षेत्ररक्षकांसोबत खेळला नाही (म्हणजे त्याच्या काळात पॉवरप्ले नव्हता). सचिन ज्या युगात खेळला तो विराटच्या युगापेक्षा पूर्णपणे वेगळा होता.’

सचिनने ब्रेट लीपासून शॉन पोलॉकपर्यंतच्या गोलंदाजांचा सामना केला –

गौतम गंभीर पुढे म्हणाला, ‘विराट कोहली आधुनिक काळातील महान खेळाडू आहे यात शंका नाही.’ सचिन तेंडुलकर जेव्हा क्रिकेट खेळायचा, तेव्हा क्रिकेट जगतात महान गोलंदाजांचा काळ होता. ग्लेन मॅकग्रा, ब्रेट ली, शोएब अख्तर, वसीम अक्रम, वकार युनूस, चामिंडा वास, मुथय्या मुरलीधरन, मखाया एनटिनी, शॉन पोलॉक हे काही गोलंदाज होते ज्यांच्या काळात सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळला होता.

हेही वाचा – IND vs SL 1st ODI: रोहित शर्मावर कोसळला दुःखाचा डोंगर; घरातील एका सदस्याचे झाले निधन

पॉवरप्लेमध्ये, फलंदाजाला धावा करण्याची संधी असते –

पण आता क्रिकेटमध्ये पॉवरप्लेचे युग आले आहे. पहिल्या पॉवरप्लेमध्ये, क्षेत्ररक्षण करणारा संघ जास्तीत जास्त २ क्षेत्ररक्षक ३० यार्डच्या बाहेर ठेवू शकतो, अशा स्थितीत फलंदाजांना जास्तीत जास्त धावा करण्याची संधी असते. त्यानंतर पॉवरप्ले २ आणि पॉवरप्ले ३ येतो. पॉवरप्ले २ हा ११ ते ४० षटकांचा असतो. ज्यामध्ये जास्तीत जास्त ४ खेळाडूंना वगळले जाऊ शकते. त्याच वेळी, शेवटच्या १० षटकांमध्ये, जास्तीत जास्त ५ क्षेत्ररक्षक ३० यार्डंमध्ये राहू शकतात.

हेही वाचा – Ranji Trophy २०२३: आसामविरुद्ध दमदार द्विशतक झळकावून पृथ्वी शॉने बीसीसीआयला लगावली सणसणीत चपराक

सामन्याबद्दल बोलायचे तर, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद ३७३ धावा केल्या. ज्यामध्ये विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या, त्याने ८७ चेंडूत ११३ धावा केल्या. त्याचबरोबर रोहित शर्माने ८३ आणि शुबमन गिलने ७० धावांचे योगदान दिले. तसेच श्रीलंका संघाकडून कसून रजिथाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 18:15 IST

संबंधित बातम्या