scorecardresearch

IND vs SL 3rd ODI: चतुर-चलाख मोहम्मद सिराजशी पंगा घेणं पडलं महागात; करुणारत्नेची एक चूक…अन् दांडी गुल, Video व्हायरल

IND vs SL Mohammed Siraj: तिसर्‍या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात मोहम्मद सिराजने आपल्या गोलंदाजीने श्रीलंकेच्या फलंदाजांना अक्षरशः हैराण करून सोडले. तर दुसरीकडे आपल्या क्षेत्ररक्षणाने सर्वांनाच थक्क केले.

IND vs SL 3rd ODI: चतुर-चलाख मोहम्मद सिराजशी पंगा घेणं पडलं महागात; करुणारत्नेची एक चूक…अन् दांडी गुल, Video व्हायरल
सौजन्य- बीसीसीआय (ट्विटर)

IND vs SL Mohammed Siraj: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने रविवारी श्रीलंकेविरुद्धच्या तिसर्‍या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घातला, तर दुसरीकडे त्याच्या क्षेत्ररक्षणाने सर्वांनाच थक्क केले. त्याने श्रीलंकेचा फलंदाज चमिका करुणारत्नेला अशा प्रकारे धावबाद केले की चाह्त्यांच्याच काय तर त्याच्या स्वतःच्या डोळ्यांवर देखील विश्वास बसत नव्हता. सिराजचे शानदार क्षेत्ररक्षण पाहून क्रिकेटप्रेमींना एमएस धोनीची आठवण झाली.

श्रीलंकेविरुद्धच्या तिरुअनंतपुरम एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने धावांचा एवढा ढीग केला की, त्यांच्यासमोर विरोधी संघ पूर्णपणे असंतुलित दिसत होता. या सामन्यात सिराजने चार विकेट घेतल्या. सामन्यानंतर त्याने पाच विकेट्स न घेता आल्याची व्यथाही व्यक्त केली. असे असूनही पॉवरप्लेमध्ये सिराजच्या घातक गोलंदाजीचे सर्वजण कौतुक करत आहेत.

चतुर-चलाख मोहम्मद सिराज

भारताकडून खेळताना मोहम्मद सिराजचा ‘अँग्री यंग मॅन’ हे रूप आपण यापूर्वी अनेकदा पाहिला आहे, पण आज सामन्यादरम्यान चाहत्यांना हुशार मोहम्मद सिराज दिसला. सिराजने रनआऊटसह चार विकेट्स आपल्या नावावर केल्या. या रनआउट दरम्यान, भारतीय वेगवान गोलंदाजाने विरोधी संघाच्या एका छोट्याशा चुकीचा फायदा घेत त्याला धावबाद केले. रविवारी तिरुवनंतपुरममध्ये मालिकेतील तिसरा सामना खेळला गेला, ज्यामध्ये सिराजने ४ विकेट्स घेत भारतीय संघाला ३१७ धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. अशीच एक घटना या सामन्यातही पाहायला मिळाली, जेव्हा श्रीलंकेचा फलंदाज चमिका करुणारत्ने आणि सिराज हे एकमेकांना भिडले. त्यांच्यात थोडी स्लेजिंग पाहायला मिळाली.

करुणारत्ने आणि सिराज यांच्यातील स्लेजिंगचे नुकसान खुद्द श्रीलंकेच्या खेळाडूलाच सहन करावे लागले. सिराजने करुणारत्नेला उत्कृष्ट पद्धतीने बाद करत तंबूचा रस्ता दाखवला. ही संपूर्ण घटना श्रीलंकेच्या डावातील १२व्या षटकात घडली आणि सिराजने हे षटक होते. त्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर करुणारत्नेने ऑफ साइड कव्हरच्या दिशेने बचावात्मक शॉट खेळला आणि एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला पण नॉन स्ट्रायकर फलंदाजाने धाव घेण्यास नकार दिला. त्यानंतर करुणारत्ने धावबाद होण्यापासून थोडक्यात बचावला. मात्र यादरम्यान त्याचा सिराजसोबत त्याचा वाद झाला.

स्टाईल दाखवण्याच्या नादात विकेट गमावली

यानंतर सिराजने पुन्हा पुढचा चेंडू स्टंप लाइनमध्ये टाकला, ज्यावर करुणारत्नेने बचावात्मक शॉट खेळला आणि सिराजला दाखवण्यासाठी त्याच स्थितीत क्रीजच्या बाहेर उभा राहिला. करुणारत्ने सिराजला स्टाईल दाखवतोय असं वाटत होतं. त्या शॉटनंतर चेंडू थेट सिराजच्या हातात आला, त्यामुळे सिराजने संधी सोडली नाही आणि थेट थ्रो मारून स्टंप उधळल्या. यानंतर अपील केल्यानंतर प्रकरण तिसऱ्या पंचाकडे गेले आणि तेथून करुणारत्नेला धावबाद घोषित करण्यात आले. अशाप्रकारे सिराजला विकेट देऊन त्याच्याशी वाद घालण्याची किंमत करुणारत्नेला चुकवावी लागली.

हेही वाचा: IND vs SL 3rd ODI: विराट-सिराजच्या रुपात श्रीलंकेवर संक्रांत! ३१७ धावांनी उडवला धुव्वा, भारताचे मालिकेवर ३-०ने निर्विवाद वर्चस्व

सिराजची मालिकेतील कामगिरी

सिराजने मालिकेतील तीन सामन्यांमध्ये १०.२२च्या सरासरीने सर्वाधिक ९ विकेट्स घेतल्या. त्याची सर्वोत्तम कामगिरी ३२ धावांत ४ विकेट्सची होती, जी शेवटच्या सामन्यात आली होती. ही त्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीही होती. सिराजचा इकॉनॉमी रेटही ४च्या आसपास राहिला, जो खूप चांगला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 11:52 IST

संबंधित बातम्या