भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने एक विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहित टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. लखनऊ येथे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने ही कामगिरी केली. रोहितला विक्रम करण्यासाठी ३७ धावांची गरज होती. ३३०० धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.

या विक्रमात रोहितने न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टिलला मागे टाकले. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. नवा कर्णधार झाल्यानंतर रोहितने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही आणि सर्व ९ सामने जिंकले आहेत. रोहित आणि इशान किशन यांनी पहिल्या विकेटसाठी १११ धावांची भागीदारी केली.

या सामन्यात रोहित शर्मा ४४ धावा करून बाद झाला. त्याने ३२ चेंडूंचा सामना करत २ चौकार आणि एक षटकार मारला. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये रोहितने ११५ डावात ३३च्या सरासरीने ३३०७ धावा केल्या आहेत. त्याने ४ शतके आणि २६ अर्धशतके केली आहेत. यात त्याने १५५ षटकारही मारले आहेत.

हेही वाचा – IPL 2022 : विराटनं का सोडलं RCBचं कर्णधारपद? खरं कारण आलं समोर!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित शर्मा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू आहे. त्याने ४ शतके झळकावली आहेत. ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आणि न्यूझीलंडचा कॉलिन मुनरो यांनी ३-३ शतके झळकावली आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंबद्दल बोलायचे झाले, तर मार्टिन गप्टिल ३२९९ धावांसह दुसऱ्या तर विराट कोहली ३२९६ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. गप्टिलने २ शतके झळकावली आहेत. त्याचबरोबर कोहलीला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकही शतक झळकावता आलेले नाही.