Jasprit Bumrah Bowling: वेस्टइंडिजचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र वेस्टइंडिजचा हा निर्णय पूर्णपणे फसला आहे. भारतीय गोलंदाजांच्या दमदार गोलंदाजीच्या बळावर वेस्टइंडिजचा पहिला डाव अवघ्या १६२ धावांवर आटोपला. दरम्यान जसप्रीत बुमराहने २ यॉर्कर चेंडू टाकून जस्टिन ग्रीव्हज आणि जोहान लेनची दांडी गुल केली, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दमदार सुरूवात करून दिली. सिराजने वेस्टइंडिजला पहिला धक्का दिला . त्यानंतर बुमराहने खातं उघडलं. वेस्टइंडिजच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना हवी तशी सुरूवात करून देता आली नाही. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना वेस्टइंडिजवर दबाव बनवून ठेवण्याची संधी मिळाली. दरम्यान शेवटी जस्टिन ग्रीव्हजने वेस्टइंडिजचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण बुमराहने त्याला त्रिफळाचित करत माघारी धाडलं.

तर झाले असे की, जस्टिन ग्रीव्हज वेस्टइंडिजडून सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला. ग्रीव्हजने एक बाजू धरून ठेवली होती. त्याने ४८ चेंडूंचा सामना करत ३२ धावा केल्या. यादरम्यान त्याने ४ चौकार मारले. भारतीय संघाकडून ३९ वे षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला. या षटकातील शेवटचा चेंडू बुमराहने यॉर्कर टाकला. जो इनस्विंग होऊन आत आला आणि जस्टिन ग्रीव्हजला त्रिफळाचित करून गेला. हा चेंडू इतका वेगवान होता की ऑफ स्टंप उडून लांब पडला. त्यानंतर ४१ व्या षटकात त्याने जोहान लेनची देखील दांडी गुल केली. या षटकातील पहिलाच चेंडू बुमराहने यॉर्कर चेंडू टाकला. हा चेंडूवर त्याने ऑफ आणि मिडल स्टंप उडवला.

वेस्टइंडिजचा पहिला डाव १६२ धावांवर आटोपला

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला येण्याचा निर्णय पूर्णपणे फसला. वेस्टइंडिजला सुरूवातीला मोठे धक्के बसले. वेस्टइंडिजकडून तेजनारायण चंदरपॉल शून्यावर माघारी परतला. तर जॉन कॅम्पबेलने ८, अलिक अथानाझेने १२, ब्रँडन किंगने १३, शाई होपने २६, रोस्टन चेसने २४, जस्टिन ग्रीव्हजने ३२, जोमेल वॅरिकनने ८, खारी पियरेने ११, जोहान लेनने १ आणि जेडेन सील्स ६ धावांवर नाबाद राहिला. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४, जसप्रीत बुमराहने ३, कुलदीप यादवने २ आणि वॉशिंग्टन सुंदरने १ गडी बाद केला. वेस्टइंडिजचा पहिला डाव १६२ धावांवर आटोपला.