KL Rahul Celebration After Century: भारत आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या वेस्टइंडिजचा डाव अवघ्या १६२ धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने दमदार सुरूवात करत वेस्टइंडिजवर आघाडी मिळवली आहे. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना शुबमन गिल अर्धशतकी खेळी करून माघारी परतला. तर केएल राहुलने एक बाजू धरून ठेवली आणि दमदार शतक झळकावलं. हे शतक त्याच्यासाठी खूप खास आहे. त्यामुळे शतक झळकावल्यानंतर त्याने हटके स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केलं.
केएल राहुलला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. परदेशात फलंदाजी करणं सोपं नसतं, असं म्हटलं जातं. कारण इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेतील परिस्थिती ही गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. पण केएल राहुलने याच देशांमध्ये आपल्या ११ कसोटी शतकांपैकी ९ शतकं झळकावली आहेत. तर या देशांच्या तुलनेत भारतात फलंदाजी करणं तसं सोपं आहे. पण केएल राहुलला भारतात केवळ २ शतकं झळकावता आली आहेत. याआधी त्याने मायदेशातील पहिलं शतक २०१६ मध्ये इंग्लंडविरूद्ध खेळताना झळकावलं होतं. आता दुसरं शतक झळकावण्यासाठी त्याला तब्बल ९ वर्ष वाट पाहावी लागली. हा दुष्काळ ३२११ दिवसांनंतर वेस्टइंडिजविरूद्धच्या पहिल्या कसोटीत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर येऊन संपला. त्यामुळे हे शतक त्याच्यासाठी खूप खास आहे.
ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या बॉर्डर- गावसकर कसोटी मालिकेत त्याला पहिल्याच कसोटीत डावाची सुरूवात करण्याची संधी मिळाली होती. या संधीचा फायदा घेत त्याने सलामीवीर म्हणून संघात आपलं स्थान निश्चित केलं. रोहित शर्मा संघात परतल्यानंतरही केएल राहुलने डावाची सुरूवात केली. ऑस्ट्रेलियाविरूद्ध दमदार खेळी केल्यानंतर त्याने इंग्लंडविरूद्ध खेळतानाही आपली छाप सोडली. परदेशात धावांचा पाऊस पाडणाऱ्या केएल राहुलला भारतात आपलं दुसरं शतक झळकावण्यासाठी ९ वर्ष वाट पाहावी लागली. वेस्टइंडिजविरूद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने १९० चेंडूंचा सामना करत १२ चौकारांच्या साहाय्याने कसोटी क्रिकेटमधील ११ वे शतक पूर्ण केले. दरम्यान शतक झळकावल्यानंतर त्याने सेलिब्रेशन केलं. त्याने हेल्मेट काढलं आणि शिट्टी वाजवली. या हटके सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गेल्यावेळी त्याने दोन्ही बोटं कानात टाकून सेलिब्रेशन केलं होतं. यावेळी त्याने शिट्टी वाजवली. तब्बल ९ वर्षांनंतर त्याने हे शतक झळकावलंय, त्यामुळे त्याने हे सेलिब्रेशन केलं असल्याचं म्हटलं जात आहे.
भारतीय संघ मजबूत स्थितीत
वेस्टइंडिजचा पहिला डाव १६२ धावांवर आटोपल्यानंतर भारतीय फलंदाज फलंदाजीला आले. भारतीय संघाकडून सलामीला आलेल्या केएल राहुल आणि यशस्वी जैस्वालने दमदार सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६८ धावा जोडल्या. यशस्वी जैस्वाल ३६ धावांवर माघारी परतला. तर केएल राहुलने १०० धावांची खेळी केली. तर साई सुदर्शन अवघ्या ७ धावा करत माघारी परतला. कर्णधार शुबमन गिलने ५० धावांची खेळी केली. भारतीय संघाने वेस्टइंडिजवर मोठी आघाडी घेतली आहे.