IND vs WI 2nd T20 Result, 01 August 2022 : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी २० सामना सेंट किट्समधील बॅस्टेअर वॉर्नर पार्क येथे खेळवला गेला. या सामन्यात विंडीजने भारताचा पाच गडी राखून पराभव केला. ओबेड मॅकॉयच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजी निष्प्रभ ठरली. संपूर्ण भारतीय संघ १९.४ षटकांमध्ये केवळ १३८ धावांवर गुंडाळला गेला.

भारताने विजयासाठी दिलेले १३९ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडीजने चार चेंडू शिल्लक असतानाच विजयावर शिक्कामोर्तब केले. वेस्ट इंडिजकडून ब्रँडन किंगने अर्धशतकी खेळी करून सर्वाधिक ६८ धावा केल्या. त्यामध्ये आठ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. त्याशिवाय डेव्हॉन थॉमसने नाबाद १९ आणि कर्णधार निकोलस पूरनने १४ धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, आर अश्विन, हार्दिक पांड्या आणि आवेश खान यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

त्यापूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार रोहित शर्मा डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. यानंतर तिसऱ्या षटकात सूर्यकुमार यादव (११), पाचव्या षटकात श्रेयस अय्यर (१०) आणि सातव्या षटकात ऋषभ पंत (२४) एकापाठोपाठ बाद झाले. त्यानंतर हार्दिक आणि जडेजाने पाचव्या गड्यासाठी ४३ धावांची भागीदारी केली. मात्र, १४व्या षटकात होल्डरने पंड्याला बाद करून भारताला पाचवा धक्का दिला. पंड्याने सर्वाधिक ३१ धावा केल्या.

हेही वाचा – शुबमन गिलच्या सर्वात लाडक्या व्यक्तीने काढली सारा तेंडुलकरची दृष्ट! सोशल मीडियावर चर्चांना उधाण

मॅकॉयने जडेजाला २७ या वैयक्तिक धावसंख्येवर बाद केले. त्यानंतर त्याने १९व्या षटकात दिनेश कार्तिक, अश्विन आणि भुवनेश्वर कुमार यांना बाद करून टी २० क्रिकेटमधील आपला पहिला फाइव्ह विकेट हॉल पूर्ण केला. जेसन होल्डरने शेवटच्या षटकात आवेश खानला त्रिफळाचित करून भारताचा डाव १३८ धावांवर गुंडाळला.

डावखुऱ्या मॅकॉयने केवळ १७ धावांत सहा गडी बाद केले. ही त्याच्या टी २० कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. शिवाय, टी २० क्रिकेटमधील वेस्ट इंडीजच्या कोणत्याही गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. मॅकॉयशिवाय जेसन होल्डरने दोन बळी घेतले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने ६८ धावांनी जिंकला होता. तर, दुसरा सामना विंडीजने जिंकला आहे. त्यामुळे दोन्ही संघ मालिकेत बरोबरीत आले आहेत.