John Campbell Record: भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने ५१८ धावांचा डोंगर उभारून डाव घोषित केला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजचा पहिला डाव २४८ धावांवर आटोपला. भारताने वेस्ट इंडिजला फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजला भारतीय संघाने सुरूवातीला मोठे धक्के दिले. पण कॅम्पबेल आणि शे होपने मिळून वेस्ट इंडिजचा डाव सांभाळला. यादरम्यान कॅम्पबेलने षटकार मारून आपलं शतक पूर्ण केलं. हे शतक वेस्ट इंडिज संघासाठी खूप खास ठरलं आहे.
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. भारतीय संघाने ५१८ धावा करून डाव घोषित केला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजला हवी तशी सुरूवात करता आली नव्हती. सलामीवीर फलंदाज जॉन कॅम्पबेल अवघ्या १० धावा करत माघारी परतला होता. पण दुसऱ्या डावात संघाला फॉलोऑन मिळालेला असताना कॅम्पबेल खंबीरपणे उभा राहिला. कॅम्पबेलने शे होपसोबत मिळून १५० हून अधिक धावांची भागीदारी केली. या दरम्यान त्याने १७४ चेंडूंचा सामना करत आपलं पहिलं शतक पूर्ण केलं. त्याने षटकार मारून आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. यासह २००२ नंतर भारतात कसोटी क्रिकेट खेळताना वेस्ट इंडिजचा पहिलाच सलामीवीर फलंदाज ठरला आहे.
कॅम्पबेलची विक्रमी खेळी
कॅम्पबेल हा भारतात भारतीय संघाविरूद्ध कसोटी क्रिकेट खेळताना शतकी खेळी करणारा वेस्ट इंडिजचा १४ वा सलामीवीर फलंदाज ठरला आहे. गेल्या २३ वर्षांपासून वेस्ट इंडिजच्या एकाही सलामीवीर फलंदाजाला असा पराक्रम करता आला नव्हता. २००२ मध्ये वेस्ट इंडिजचा सलामीवीर फलंदाज वेव्हेल हिंड्सने कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर शतकी खेळी केली होती. अॅलन फिट्जरॉय रे हे भारतीय संघाविरूद्ध भारतात कसोटी क्रिकेट खेळताना वेस्ट इंडिजचे पहिलेच सलामीवीर फलंदाज होते.
वेस्ट इंडिजचं दमदार पुनरागमन
या सामन्यातीस पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारून भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजचा पहिला डाव स्वस्तात संपुष्टात आणला. त्यामुळे वेस्ट इंडिजला फॉलोऑन मिळाला. दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजला चांगल्या सुरूवातीची गरज होती. पण तसं काही झालं नाही. सलामीला आलेला तेगनारायण चंद्रपॉल अवघ्या १० धावांवर माघारी परतला. तर अॅलिक अँथेंज अवघ्या ७ धावांवर माघारी परतला. वेस्ट इंडिजला ३५ धावांवर दुसरा धक्का बसला. पण त्यानंतर शे होप आणि कॅम्पबेलने मिळून वेस्ट इंडिजला दमदार पुनरागमन करून दिलं आहे.