विंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाचा संघ रविवारी जाहीर झाला. या संघात अनुभवी खेळाडूंसोबतच अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र या संघात शुभमन गिल आणि अजिंक्य रहाणे यांना स्थान देण्यात आलेले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यातच आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) शुभमन गिलला संघातून वगळण्याच्या निर्णयावर थेट प्रश्न केला आहे.

विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज मिळाला नाही. त्यामुळे वन डे संघात शुभमन गिल किंवा अजिंक्य रहाणे यांना संधी मिळेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. पण निवड समितीने या दौऱ्यासाठी श्रेयस अय्यर, कृणाल पांड्या, राहुल चहर, दिपक चहर, वॉशिंग्टन सुंदर, नवदिप सैनी आणि खलिल अहमद या तरुण खेळाडूंना संधी दिली. यात सातत्याने चांगली आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शुभमन गिलचा समावेश होणे अपेक्षित होत का? असा सवाल ICC ने केला आहे.

न्यूझीलंड दौऱ्यावर शुभमन गिल याने २ एकदिवसीय सामने खेळले. त्यामुळे विंडीज दौऱ्यातील संघात त्याचे नाव सर्वांना अपेक्षित होते. भारत A संघाकडून विंडीज दौऱ्यावर शुभमन गिलने धडाकेबाज कामगिरी केली. भारत A संघाकडून खेळताना गिलने ५५ च्या सरासरीने सर्वाधिक २१८ धावाही केल्या आणि एकदिवसीय मालिकेत विंडीज A संघाला ४-१ अशी धूळ चारली.

शुभमन गिल यानेही निवड समितीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. “विंडीज दौऱ्यातील कोणत्याही एका संघात स्थान मिळेल, अशी अपेक्षा होती. पण, संघ जाहीर झाला आणि मी काहीसा निराश झालो. क्रिकेट ही माझी आवड आहे हे लक्षात ठेवून मी त्यानंतर एक निर्णय घेतला की या संघ निवडीचा अधिक विचार करायचा नाही. यात वेळ वाया घालवायचा नाही. मी सातत्यपूर्ण कामगिरी करत राहीन. आणि मला खात्री आहे कि त्याच्याच बळावर माझी दखल निवड समिती घेईल”, असे गिल म्हणाला होता.