Jemimah Rodrigues On Number 3 Batting Position: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलचा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी ३३९ धावांचा डोंगर सर करायचा होता. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून जेमिमा रॉड्रिग्जने नाबाद शतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने दमदार विजयाची नोंद केली. भारतीय संघाचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. या दमदार खेळीच्या बळावर तिची सामनावीर म्हणून नेमणूक करण्यात आली.

या सामन्यात जेमिमा रॉड्रिग्जला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. ती सहसा या क्रमांकावर फलंदाजीला येत नाही. पण या महत्वाच्या सामन्यात तिला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि या संधीचा फायदा घेत तिने शतक झळकावून भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याबाबत काय म्हणाली जेमिमा रॉड्रिग्ज?

जेमिमा रॉड्रिग्जला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी ती म्हणाली, “ दुसरा डाव सुरू होण्याच्या ५ मिनिटांपूर्वी मला सांगण्यात आलं की, मी ५ नाही तर ३ नंबरला फलंदाजीला जाणार आहे. मला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळणार आहे, याची मला कल्पना होती आणि त्यासाठी मी तयार होते. जेव्हा मला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला जायचं होतं त्यावेळी मी स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात नव्हते. माझ्या डोक्यात एकच गोष्ट सुरू होती, ती म्हणजे माझ्या देशाला हा सामना जिंकून देणं. कारण आम्ही नेहमीच अशा परिस्थितीत सामना गमावला आहे.”

गेल्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी जेमिमा रॉड्रिग्जला संघात स्थान दिलं गेलं नव्हतं. याबाबत बोलताना ती म्हणाली, “गेल्यावेळी झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी मला संघात स्थान दिलं गेलं नव्हतं. यावेळी मला संघात स्थान मिळालं. मी चांगल्या फॉर्ममध्ये होते. पण एकापाठोपाठ एक गोष्टी घडत गेल्या, ज्यावर मी नियंत्रण ठेवू शकले नाही. पण माझ्या आजुबाजूला काही लोकं होते जे माझ्यावर विश्वास ठेवत होते.” जेमिमाने ३३९ धावांचा पाठलाग करताना नाबाद १२७ धावांची खेळी केली आणि भारतीय संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळवून दिलं.