Amol Muzumdar Message To Team India Before Final Match: भारतीय संघाने याआधी दोन वेळा महिला वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला होता. ट्रॉफिच्या अगदी जवळ पोहोचूनही ट्रॉफी जिंकण्याची संधी थोडक्यात हुकली होती. पण यावेळी भारतीय खेळाडूंनी करून दाखवलं. सेमीफायनलमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलिया आणि अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून भारतीय संघाने पहिल्यांदाच जेतेपदाची ट्रॉफी उंचावली. पण भारतीय संघासाठी हा प्रवास मुळीच सोपा नव्हता. गेल्या काही वर्षांत अनेक चढउतार आले, प्रशिक्षक बदलले. अखेर अमोल मुझुमदारांच्या प्रशिक्षणाखाली खेळताना भारताने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. दरम्यान फायनल सामन्याआधी अमोल मुझुमदार भारतीय खेळाडूंना काय म्हणाले? जाणून घ्या.

कुठल्याही संघाच्या विजयात प्रशिक्षकांचा मोलाचा वाटा असतो. भारतीय संघाने स्पर्धेतील सुरुवातीचे दोन सामने जिंकल्यानंतर पुढील लागोपाठ ३ सामने गमावले. इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या तिन्ही बलाढ्य संघांविरुद्ध खेळताना भारताचा पराभव झाला. त्यावेळी असं वाटलं की, यंदा भारतीय संघ साखळी फेरीतून बाहेर पडणार. पण भारतीय संघाने दमदार पुनरागमन केलं आणि न्यूझीलंडला पराभूत करून सेमीफायनलमध्ये आपलं स्थान पक्क केलं.

सेमीफायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. हा सामना अंतिम फेरीपेक्षा कमी नव्हता. कारण ऑस्ट्रेलियाचा संघ बाद फेरीतील सामन्यांमध्ये आणखी घातक ठरतो. पण भारतीय पोरी जिद्दीने लढल्या आणि बलाढ्य ऑस्ट्रेलियाला स्पर्धेबाहेर करून अंतिम फेरीत स्थान मिळवलं

अंतिम सामन्याआधी अमोल मुझुमदार भारतीय खेळाडूंना काय म्हणाले?

अंतिम सामन्याआधी भारतीय संघाला काय मेसेज दिला होता? याबाबत बोलताना अमोल मुझुमदार म्हणाले, “आज मी इतकंच म्हणालो की, गेल्या २ वर्षांपासून आपण जो मेहनत केली आहे ती २ नोव्हेंबरसाठी केली आहे ३० ऑक्टोबरसाठी नाही. ३० ऑक्टोबरमध्ये गुंतून राहिलात तर २ नोव्हेंबर साजरं करता येणार नाही. त्यामुळे २ नोव्हेंबरमध्येच राहा.” अमोल मुझुमदारांचे हे शब्द कानी पडताच भारतीय खेळाडूंमध्ये उत्साह संचारला. अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नसते. भारतीय खेळाडूंनी मायदेशात खेळताना पहिल्यांदा वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. दरम्यान अमोल मुझुमदार हे भारतीय महिला संघाला वर्ल्डकप जिंकून देणारे पहिलेच प्रशिक्षक ठरले आहेत.