चॅम्पियन्स करंडक २०१७ च्या स्पर्धेत भारताने बांगलादेशवर मात करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. त्यामुळे संपूर्ण क्रिकेट जगतासह भारतीय क्रिकेट रसिक रविवारच्या सामन्याची वाट बघत आहेत. मात्र हा रविवार भारतीयांसाठी खऱ्या अर्थाने सुपर संडे ठरणार आहे. कारण भारत आणि पाकिस्तानचे संघ दोन वेळा एकमेकांसमोर भिडणार आहेत.

तुम्हाला वाचून कदाचित आश्चर्य वाटलं असेल, मात्र भारत-पाकिस्तानमधला दुसरा सामना हा हॉकीच्या मैदानात होणार आहे. लंडनमध्ये नुकतीच वर्ल्ड हॉकी लिग सेमीफायनल स्पर्धेला सुरुवात झाली आहे. यातल्या पहिल्या सामन्यात भारताने स्कॉटलंडचा ४-१ ने धुव्वा उडवला. याच स्पर्धेत भारताचा रविवारी पाकिस्तानविरुद्ध सामना होणार आहे. त्यामुळे भारतीय क्रीडारसिकांसाठी ही खऱ्या अर्थाने मेजवानीच ठरणार आहे.

भारत-पाक सामन्यांदरम्यान सोशल मीडियावरच वातावरण खूप तापलेलं असतं. दोन्ही देशांचे पाठीराखे आपल्या प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करत असतात. या ट्रोलिंगचा फटका बऱ्याच वेळा मोठमोठ्या सेलिब्रेटींनाही बसला आहे. त्यामुळे येत्या रविवारी भारताने पाकिस्तानच्या दोन्ही संघाना नामोहरम केलं तर भारतीयांच्या आनंदाला पारावार उरणार नाही हे मात्र नक्की.

क्रिकेटमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यांचा इतिहास हा काहीसा भारताच्या बाजूने झुकलेला आहे. हॉकीत मात्र पाकिस्तानचा संघ हा कधीही पलटवार करु शकतो. मात्र हॉकी संघाचे प्रशिक्षक रोलंट ओल्टमन्स यांनी गेल्या काही वर्षांत भारतीय संघाची चांगली बांधणी केली असल्यामुळे हॉकीच्या मैदानातही भारतच पाकिस्तानला वरचढ ठरेल, अशी इच्छा क्रीडारसिक व्यक्त करतायत.

त्यामुळे या ‘सुपर संडे’ला पाकिस्तान भारताला हरवणार की भारत पाकिस्तानवर पुन्हा मात करुन मौका मौकाचं सेलिब्रेशन करणार, हे अवघ्या दिवसांतच आपल्या समोर येईल.