दक्षिण आशियाई स्पर्धेतील पराभवानंतर भारतीय संघ नेपाळविरुद्ध येथे मंगळवारी होणाऱ्या प्रदर्शनीय फुटबॉल सामन्यात विजय मिळविण्याबाबत आशावादी आहे.
भारताला दक्षिण आशियाई स्पर्धेत नेपाळने २-१ असे हरविले होते. या पराभवाची परतफेड करण्यासाठी भारतीय संघाने जय्यत तयारी केली आहे. फिलिपाइन्सविरुद्धची प्रदर्शनीय लढत १-१ अशी बरोबरीत ठेवल्यामुळे भारताचा आत्मविश्वास उंचावला आहे.
भारतीय संघाचे प्रशिक्षक विम कोव्हरमन्स यांनी मंगळवारच्या सामन्याबाबत आत्मविश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘फिलिपाइन्सचा संघ आमच्यापेक्षा वरचढ मानला जात होता. तरीही आमच्या खेळाडूंनी सुरेख सांघिक कौशल्य दाखवित त्यांना चांगली लढत दिली व सामना बरोबरीत ठेवला. मंगळवारच्या लढतीत त्याचा फायदा आमच्या खेळाडूंना मिळेल. शेवटपर्यंत सर्वोत्तम कौशल्य दाखविण्याचा आमचा प्रयत्न राहील. दक्षिण आशियाई स्पर्धेतील पराभवानंतर आम्ही या लढतीचा बारकाईने अभ्यास केला आहे. त्यामध्ये झालेल्या चुका टाळण्यावर आमचा भर राहणार आहे.’’  
भारताचा कर्णधार सुनील छेत्री याने नेपाळविरुद्धच्या पराभवाची परतफेड करण्याचा आत्मविश्वास व्यक्त करीत सांगितले की, ‘‘गोल करण्याच्या संधी वाया घालून चालणार नाही. मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा लाभ घेण्याचा आम्ही निश्चय केला आहे. प्रत्येक सामना हा नवीन सामना आहे, असे मानून आम्ही त्याप्रमाणे व्यूहरचना करीत आहोत.’’