वृत्तसंस्था, मिरपूर
मेहदी हसन मिराज (३/१२) आणि शाकिब अल हसन (१/२१) या बांगलादेशच्या फिरकीपटूंपुढे दुसऱ्या डावात भारताची आघाडीची फळी ढेपाळली. त्यामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना रंगतदार वळणावर आहे. बांगलादेशने दिलेल्या १४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची तिसऱ्या दिवसअखेर ४ बाद ४५ अशी स्थिती होती. त्यामुळे विजयासाठी भारताला अजूनही १०० धावांची आवश्यकता आहे.मिरपूर येथे सुरू असलेल्या या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दोन्ही संघांतील गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. मात्र, त्याच वेळी लिटन दास (९८ चेंडूंत ७३ धावा) आणि सलामीवीर झाकीर हसन (१३५ चेंडूंत ५१) यांनी केलेल्या खेळी बांगलादेशसाठी महत्त्वाच्या ठरल्या. भारताचे ढिसाळ क्षेत्ररक्षणही बांगलादेशच्या पथ्यावर पडले. स्लीपमध्ये विराट कोहलीने तीन झेल सोडले. त्यामुळे बांगलादेशला दुसऱ्या डावात २३१ धावांची मजल मारता आली आणि त्यांनी भारतापुढे १४५ धावांचे आव्हान ठेवले. भारताच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना दुसऱ्या डावातही चमक दाखवता आली नाही. ते बांगलादेशच्या दर्जेदार फिरकीपटूंविरुद्ध चाचपडताना दिसले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताचा कर्णधार केएल राहुलला (२) बांगलादेशचा कर्णधार व डावखुरा फिरकीपटू शाकिबने डावाच्या तिसऱ्याच षटकात माघारी धाडले. त्यानंतर ऑफ-स्पिनर मेहदी हसनच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक नुरुल हसनने चेतेश्वर पुजारा (६) आणि शुभमन गिल (७) यांना यष्टिचित केले. मेहदीनेच कोहलीलाही (१) बाद करत भारताच्या अडचणी वाढवल्या. मात्र, चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या अक्षर पटेलने काही चांगले फटके मारले. त्यामुळे दिवसअखेर तो ५४ चेंडूंत नाबाद २६ धावांवर खेळत होता. जयदेव उनाडकट (नाबाद ३) त्याच्यासोबत खेळपट्टीवर होता. चौथ्या दिवशी या दोघांसह ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि अश्विनवर भारताच्या फलंदाजीची भिस्त असेल.

तत्पूर्वी, तिसऱ्या दिवशी बिनबाद ७ वरून पुढे खेळणाऱ्या बांगलादेशचा दुसरा डाव २३१ धावांवर आटोपला. एकीकडे गडी बाद होत असताना दुसरीकडे सलामीवीर झाकीरने ५१ धावांची खेळी करताना बांगलादेशचा डाव सावरला. तो बाद झाल्यावर लिटनने बांगलादेशच्या डावाची सूत्रे हाती घेतली. लिटनने ९८ चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने ७३ धावांची खेळी केली. तसेच नुरुल हसन (२९ चेंडूंत ३१) आणि तस्किन अहमद (४६ चेंडूंत नाबाद ३१) यांचे योगदानही बांगलादेशसाठी महत्त्वाचे ठरले.

संक्षिप्त धावफलक
बांगलादेश (पहिला डाव) : २२७
भारत (पहिला डाव) : ३१४
बांगलादेश (दुसरा डाव) : ७०.२ षटकांत सर्वबाद २३१ (लिटन दास ७३, झाकीर हसन ५१; अक्षर पटेल ३/६८, मोहम्मद सिराज २/४१)
भारत (दुसरा डाव) : २३ षटकांत ४ बाद ४५ (अक्षर पटेल नाबाद २६; मेहदी हसन ३/१२, शाकिब १/२१)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India bangladesh test series india vs bangladesh test match 2022 amy
First published on: 25-12-2022 at 02:28 IST