गेल्यावेळच्या पराभवाची बोच भारतीय संघाला होतीच. दोन्ही संघांमध्ये भारतापेक्षा अफगाणिस्तानचेच पारडे जड असल्याचे म्हटले जात होते. पण मैदानात सरस खेळ करत अखेर भारताने बाजी मारली आणि सातव्यांदा दक्षिण आशियाई फुटबॉल स्पध्रेत (सॅफ) जेतेपदाला गवसणी घातली. सॅफ स्पर्धेच्या चुरशीच्या अंतिम फेरीत भारताने गतविजेत्या अफगाणिस्तानवर
२-१ असा निसटता विजय
मिळविला.
गतवेळी अंतिम फेरीत अफगाणिस्तानने भारताला २-० असे पराभूत केले होते. या पराभवाची परतफेड भारताने केली. झुबेर अमिरीने ७० व्या मिनिटाला अफगाणिस्तानला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र त्यांची ही आघाडी अल्पकाळ ठरली. ७२ व्या मिनिटाला जेजे लाल्पेखुलाने भारताचे खाते उघडले व १-१ अशी बरोबरी साधली. अटीतटीच्या या सामन्यात पूर्ण वेळेत १-१ अशी बरोबरी झाली होती. अतिरीक्त वेळेत भारताने हा सामनाजिंकला.
सामन्याच्या १०१ व्या मिनिटाला भारताचा अव्वल दर्जाचा खेळाडू सुनील छेत्री याने गोल करीत संघाला विजय मिळवून दिला. छेत्रीचा हा ५० वा गोल ठरला. जागतिक क्रमवारीत अफगाणिस्तानला १५० वे स्थान
असून भारत १६६ व्या स्थानावर
आहे.
भारतीय संघाचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टनटाईन यांच्या मार्गदर्शनाखाली भारताला मिळालेले हे पहिलेच आंतरराष्ट्रीय विजेतेपद आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jan 2016 रोजी प्रकाशित
अफगाणिस्तानवर मात करत भारताचे विजयी सप्तक
गतवेळी अंतिम फेरीत अफगाणिस्तानने भारताला २-० असे पराभूत केले होते.

First published on: 04-01-2016 at 05:14 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India beat afghanistan in football