अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या पाचव्या टी-20 सामन्यात भारताने इंग्लंडला 36 धावांनी मात दिली. यासह रंगतदार अवस्थेत असलेली टी-20 मालिका विराटसेनेने 3-2 अशी नावावर केली. एकीकडे विजयाचा आनंद असताना दुसरीकडे मात्र, भारतासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

या सामन्यात षटकांची गती कमी राखल्याबद्दल टीम इंडियाला मानधनाच्या 40 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. या सामन्यात निर्धारित वेळेत भारतीय संघाने दोन षटके कमी टाकली. त्यानंतर आयसीसीच्या एलिट पॅनेलचे मॅच रेफरी जवागल श्रीनाथ यांनी भारतावर दंड ठोठावला.

भारतीय संघाला आयसीसीच्या कलम 2.22 अंतर्गत दंड ठोठावण्यात आला आहे. संघाचा कर्णधार विराट कोहलीने संबंधित कारवाई मान्य केली आहे. त्यामुळे याप्रकरणी अधिक सुनावणीची गरज नसल्याचे आयसीसीने सांगितले. मैदानातील पंच अनिल चौधरी आणि नितीन मेनन आणि तिसरे पंच के.एन. अनंतपद्मनाभन यांनी टीम इंडियावर कारवाई केली.

असा झाला पाचवा टी-20 सामना

अतिशय रंगतदार झालेल्या पाचव्या टी-20 सामन्यात भारताने इंग्लंडला 36 धावांनी मात दिली. इंग्लंडचा कर्णधार ईऑन मॉर्गनने या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. भारतानेही इंग्लंडच्या निर्णयाचे स्वागत करत इंग्लंडसमोर 224 धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर जोडी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची अर्धशतके आणि सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांच्या फटकेबाजीमुळे भारताला दोनशेपार पोहोचता आले.

प्रत्युत्तरात खेळणाऱ्या इंग्लंडने जोस बटलर आणि डेव्हि़ड मलान यांच्या अर्धशतकांच्या जोरावर कडवा संघर्ष केला. मात्र, सामन्याच्या उत्तरार्धात भारताच्या गोलंदाजांनी केलेल्या दमदार प्रदर्शनामुळे इंग्लंडला निर्धारित 20 षटकात 8 बाद 188 धावांपर्यंतच पोहोचता आले. भुवनेश्वर कुमारला सामनावीर तर, विराट कोहलीला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.