Team India Registers Unique Record First Time in 93 Years: भारताच्या युवा संघाने इंग्लंड दौऱ्यावर पहिल्याच कसोटीत आपल्या कामगिरीची झलक दाखवली आहे. लीड्समध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात, सलामीवीर यशस्वी जैस्वाल, कर्णधार शुबमन गिल आणि ऋषभ पंत यांच्या शतकांच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या डावात ४७१ धावा केल्या. तर दुसऱ्या डावात केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी शतकं झळकावलं. यासह भारताच्या या नव्या संंघाने ९३ वर्षांनी एक मोठी कामगिरी नावे केली आहे.
भारताने पहिल्या डावात ४७१ धावा करत इंग्लंडसमोर धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव ४६५ धावांवर सर्वबाद झाला. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने एकट्याने इंग्लंडच्या निम्म्या संघाला पॅव्हेलियनमध्ये धाडलं. त्यानंतर, चौथ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावात २ विक्रमी शतकं पाहायला मिळाली.
केएल राहुलने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ९वं शतक झळकावलं. केएलने त्याचे शतक पूर्ण केल्यानंतर काही वेळातच, ऋषभ पंतनेही शतक झळकावून इतिहास लिहिला. कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा पंत जगातील दुसरा यष्टिरक्षक-फलंदाज बनला आहे.
भारताच्या खेळाडूंची ५ शतकं
ऋषभ पंतने १३० चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ८ वे शतक झळकावले. पंतचे शतक भारतीय कसोटी क्रिकेटच्या ९३ वर्षांच्या इतिहासातील एक मोठा मैलाचा दगड ठरला. पहिल्यांदाच भारताने एका कसोटी सामन्यात ५ शतकं झळकावली आहेत. लीड्स कसोटीपूर्वी, टीम इंडियाच्या फलंदाजांनी एकाच कसोटी सामन्यात ५ शतकं झळकावण्याचा मोठा पराक्रम याआधी कधीच केला नव्हता. याआधी, एका कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी सर्वाधिक ४ शतकं केली होती. २००७ मध्ये, भारतीय फलंदाजांनी मिरपूरमध्ये बांगलादेशविरुद्ध हा पराक्रम केला होता.
पहिल्या डावात यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि ऋषभ पंत यांनी शतकं झळकावली. यशस्वी जैस्वालने १५९ चेंडूत १६ चौकार आणि एका षटकारासह १०१ धावांची खेळी केली. तर कर्णधार शुबमन गिलने कॅप्टन म्हणून पदार्पणाच्या सामन्यात शतक केले. त्याने २२७ चेंडूत १९ चौकार आणि एका षटकारासह १४७ धावांची सर्वात मोठी खेळी केली. तर ऋषभ पंतने १७८ चेंडूत १२ चौकार आणि ६ षटकारांसह १३४ धावांची वादळी खेळी केली.
केएल राहुल आणि ऋषभ पंत शतक झळकावून माघारी परतले. दोघांनी भारताची धावसंख्या ३०० धावांच्या पलीकडे नेली आहे. आता भारतीय संघ इंग्लंडला विजयासाठी किती धावांचं आव्हान देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.