आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची दुसरी अंतिम फेरी गाठण्याची चढाओढ सुरूच आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दुसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियन संघाने दावा आणखी मजबूत केला आहे. मेलबर्न कसोटीत संघाने एक डाव आणि १८२ धावांनी मोठा विजय मिळवत, अंतिम फेरीच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले. एकीकडे दक्षिण आफ्रिकेला मोठा फटका बसला असून चौथ्या क्रमांकावर घसरला आहे.
आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी संघांची लढाई सुरूच आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियन संघ आता खूप पुढे गेला आहे. कांगारू संघ ७८.५७ च्या विजयी टक्केवारीसह पहिल्या क्रमांकावर आहे. भारताच्या खात्यात १४ सामन्यांत ८ विजय आहेत आणि त्यांची विजयाची टक्केवारी ५८.९३ आहे.
सध्या श्रीलंकेचा संघ १० कसोटी सामन्यांत ५ विजय, ४ पराभव आणि ४ अनिर्णितसह ५३.३३ विजयाच्या टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव स्वीकारणारा दक्षिण आफ्रिका १२ सामन्यांत ६ विजय आणि ६ पराभवानंतर ५०,०० विजयाच्या टक्केवारीसह चौथ्या क्रमांकावर आहे.
तीन संघांमध्ये आहे खरी स्पर्धा –
यावेळी, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची खरी स्पर्धा फक्त तीन संघांमध्ये आहे. ऑस्ट्रेलियाने जागा जवळपास निश्चित केली आहे, त्यामुळे भारत, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानासाठी लढत आहेत. भारताला ४, दक्षिण आफ्रिकेला ३ आणि श्रीलंकेला २ कसोटी सामने खेळायचे आहेत. पुढील काही दिवसांत कोणता संघ पुढे सरकतो हे ठरेल.
भारत कसा पोहोचणार अंतिम फेरीत –
टीम इंडिया आपल्या घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियासोबत ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. येथे भारताचे लक्ष्य कोणत्याही किंमतीत विजय नोंदवण्याचे असेल. टीम इंडियाने ही मालिका ३-० किंवा ४-० ने जिंकली, तर ते थेट कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करेल. दक्षिण आफ्रिकेला अद्याप ऑस्ट्रेलियाविरुद्ध १ सामना खेळायचा आहे. त्यांना वेस्ट इंडिजविरुद्ध २ सामने खेळायचे आहेत. यजमानांविरुद्ध 2 कसोटी सामने खेळण्यासाठी श्रीलंकेला न्यूझीलंडला जायचे असल्याने हा प्रवास कठीण होणार आहे.