Pakistan Arshad Nadeem: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानच्या अर्शद नदीमने भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत पाकिस्तानला पहिल्यांदाच वैयक्तिक सुवर्णपदक मिळवून दिले. तसेच अर्शदने भालाफेक स्पर्धेतील ऑलिम्पिकमधील आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले. त्याने ९२.९७ मीटर इतक्या दूरवर भाला फेकून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. सुवर्ण पदक जिंकल्यानंतर अर्शद एका रात्रीत प्रसिद्ध झाला. त्याच्यावर पाकिस्तानमधून पुरस्कारांचा वर्षाव होत आहे. पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनीही त्याला एक कोटी पाकिस्तानी रुपये देऊ केले आहेत. तर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी दीड कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे. अर्शद नदीमने २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक, २०२२ आणि २०२३ च्या जागतिक चॅम्पियन्सशिप स्पर्धेत रौप्य पदक जिंकूनही पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी त्याच्याकडे चांगला भाला नव्हता. यावर्षी मार्च महिन्यात त्याने पाकिस्तानकडे नवीन भाला विकत घेण्यासाठी विनंती केली होती, अशा बातम्या समोर आल्या होत्या. हे वाचा >> Arshad Nadeem: पाकिस्तानच्या सुवर्णपदक विजेत्या अर्शद नदीमचा संघर्ष; बांधकाम मजूराचा मुलगा, एकेकाळी जेवणही मिळत नव्हतं हे भारताचे षडयंत्र पाकिस्तानच्या समा वृत्तवाहिनीवर अर्शद नदीमला पुरेशा सुविधा उपलब्ध करून न दिल्याबाबत चर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चेदरम्यान पाकिस्तान ॲथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष मोहम्मद अक्रम साही यांनी हे आरोप फेटाळून लावले. हे भारताचे षडयंत्र असू शकते, असा आरोप त्यांनी केला. मोहम्मद अक्रम साही म्हणाले, भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश भालाफेक या स्पर्धेत एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळेच भारताकडून हे गैरसमज पसरविले जात असतील. अर्शद नदीमला सर्व सुविधा दिल्या मोहम्मद अक्रम साही पुढे म्हणाले, अर्शदकडे आधीपासूनच पुरेसे भाला होते. पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी टोक्यो ऑलिम्पिकनंतर त्याला दोन भाला भेट दिले होते. तसेच पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी ॲथलेटिक्स महासंघानेही अर्शद नदीमला भाला दिला होता. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी त्याच्याकडे भाला नव्हता, हा आरोप खोटा असल्याचे ते म्हणाले. दरम्यान अर्शद नदीमच्या विनंतीनंतर व्यावसायिक अली तरीन यांनी त्याला आर्थिक मदत केल्याचा दावा केला जात आहे. अली यांनीही अर्शदला आर्थिक मदत दिल्याचे कबूल केले. मात्र ॲथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष अक्रम यांनी हाही दावा फेटाळून लावला. अर्शद नदीमने कुणाकडेही मदतीचे आवाहन केलेले नाही. जर त्याला काही मदत हवी असेल तर त्याने महासंघाकडे येणे गरजेचे आहे. हे ही वाचा >> Arshad Nadeem New Olympic Record in Paris Olympics 2024: पाकिस्तानने ऑलिम्पिकमध्ये किती पदकं पटकावली आहेत तुम्हाला माहितेय का? एकेकाळी अन्नही घेणे होते कठीण अर्शद नदीमचे कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आले. एकेकाळी नदीमच्या कुटुंबीयांना आवडीचे अन्न घेणंही परवडत नव्हते. अर्शदचे वडील बांधकाम मजूर असून त्यांना सात मुलं होती. घरात वडीलच कमावते असल्यामुळे अर्शदच्या कुटुंबाला मांस खायचं असेल तर ईदची वाट पाहावी लागत असे, अशी आठवण अर्शदचा मोठा भाऊ शाहीद अझीमने अल जझीरा वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.