सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग हे ‘फॅब फाइव्ह’ अशी बिरुदावली मिरवणारे रथी-महारथी खेळत होते, तेव्हा भारतीय कसोटी फलंदाजांचा सुवर्णकाळ होता, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या दिग्गजांची जागा घेऊ शकणारे फलंदाज भारताला सापडतील का, हा यक्षप्रश्न मागील अनेक वष्रे क्रिकेट क्षेत्रात पडायचा. या प्रश्नाइतकाच गहन प्रश्न होता तो म्हणजे यष्टिरक्षणाचा. महेंद्रसिंग धोनीचे स्थान घेऊ शकेल अशा यष्टिरक्षकाचा शोध देशात अद्याप लागलेला नाही. कोलकाताचा वृद्धिमान साहा हा ‘वासरात लंगडी गाय शहाणी’ म्हणावी तसा त्यातल्या त्यात बरा यष्टिरक्षक-फलंदाज आहे. सध्या चालू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत साहाला दुखापत झाली आणि तब्बल आठ वर्षांनी भारताच्या निवड समितीला गुजरातच्या पार्थिव पटेलची आश्चर्यकारक आठवण झाली. त्या वेळी यष्टिरक्षणाच्या मुद्दय़ावर ‘अजूनही आपण यष्टी(रक्षक)चीतच’ होत असल्याचे सत्य अधोरेखित झाले.

[jwplayer 19exw8V5]

नयन मोंगियाने २००१मध्ये निवृत्ती पत्करल्यानंतर काही काळ त्याची जागा कशी भरायची हा प्रश्न निर्माण झाला होता. त्या वेळी एकदिवसीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविडने ही जबाबदारी हिमतीने सांभाळली. तर कसोटी क्रिकेटमध्ये समीर दिघे, विजय दहिया, अजय रत्रा, दीप दासगुप्ता, पार्थिव पटेल आणि दिनेश कार्तिक हे पर्याय हाताळले गेले. परंतु यापैकी कोणालाही स्थिरस्थावर होता आले नाही. २००५मध्ये धोनीने कसोटी पदार्पण केले आणि दोन वर्षांतच तो भारतीय क्रिकेटचा अविभाज्य भाग झाला. २००८मध्ये अनिल कुंबळेने तडकाफडकी निवृत्ती पत्करली आणि भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व धोनीकडे आले. त्यानंतर नोव्हेंबर २००९ ते ऑगस्ट २०११ या कालावधीत भारतीय संघाने कसोटीमधील सर्वोच्च स्थान प्राप्त केले. फलंदाज, यष्टिरक्षण आणि नेतृत्व या तिन्ही जबाबदाऱ्या तो कसोशीने पाहात होता. त्याने ९० कसोटी सामन्यात ३८.०९ धावांच्या सरासरीने ४,८७६ धावा केल्या होत्या.

२०१४मध्ये धोनीच्या निवृत्तीनंतर स्वाभाविकपणे साहा हाच पहिला पर्याय समोर होता. कारण धोनी संघात असताना साहा राखीव यष्टिरक्षक म्हणून संघासोबत असायचा, तर क्वचितच कधी धोनीच्या अनुपस्थितीत तो यष्टिरक्षण करायचा. गेल्या सहा वर्षांत साहाच्या वाटय़ाला फक्त १५ सामने आले. यात त्याने सरासरी राखली आहे ती २८.१९ धावांची. मात्र प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने  ४०हून अधिक सरासरीने धावा केल्या आहेत. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साकारलेल्या एखाद्या झुंजार खेळीव्यतिरिक्त कोणतीही लक्षवेधी चुणूक अद्याप त्याने दाखवलेली नाही. साहा सध्या ३२ वर्षांचा आहे, ही भारताच्या दृष्टीने आणखी एक चिंतेची बाब आहे. नमन ओझा आणि दिनेश कार्तिक या अन्य पर्यायांनीसुद्धा वयाची तिशी ओलांडली आहे.

नमनकडे प्रथम श्रेणीचा पुरेसा अनुभव गाठीशी आहे. परंतु सातत्याचा अभाव असल्यामुळे उच्चस्तरावर आपले नाणे खणखणीत असल्याचे तो सिद्ध करू शकला नाही. कार्तिकने यष्टिरक्षक म्हणून शर्यतीत मागे पडत असल्याचे लक्षात येताच विशेषज्ञ फलंदाज म्हणूनसुद्धा प्रयत्न केले, पण ते थिटे पडले. रॉबिन उथप्पाने स्थानिक क्रिकेटमध्ये धावांचा वर्षांव केला. मात्र कसोटी क्रिकेटला आवश्यक कौशल्याचा त्यात कमालीचा अभाव होता. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो धोनीला पर्याय ठरू शकेल. संजू सॅमसनने आयपीएलमध्ये फलंदाजीप्रमाणेच यष्टिरक्षणाचीही जबाबदारी समर्थपणे सांभाळली. रणजीतनेसुद्धा चमक दाखवली. मात्र त्याला भारतीय संघात स्थान देणे घाईचे ठरू शकेल. अंबाती रायुडू आणि के. एल. राहुल हे त्यांच्या यष्टिरक्षणापेक्षा फलंदाजीसाठी विशेष ओळखले जातात. ३१ वर्षांच्या रायुडूसाठी कसोटीचे स्वप्न दूर आहे. राहुल सध्या तरी सलामीवीराच्या भूमिकेकडे लक्ष केंद्रित करीत आहे. मात्र पाच गोलंदाजांसह खेळण्याचा संकल्प जोपासणाऱ्या कर्णधार विराट कोहलीला राहुल उपयुक्त ठरू शकतो. आयपीएलमध्ये राहुल यष्टिरक्षक-फलंदाज या दोन्ही भूमिकांना उत्तम न्याय देतो.

[jwplayer psUg1N0g]

साहाच्या दुखापतीमुळे सध्या ३१ वर्षीय पार्थिवला ही सुवर्णसंधी मिळाली आहे. २००२मध्ये त्याने धोनीच्या उदयाच्या तीन वष्रे आधी वयाच्या १७व्या वर्षी इंग्लंडविरुद्धच कसोटी पदार्पण केले होते. मात्र सुरुवातीची काही वर्षे वगळता तो स्थानिक क्रिकेटमध्येच अधिक चमकला. १४ वर्षांच्या कारकीर्दीत तो फक्त २० कसोटी सामने खेळला. २००८मध्ये मिळालेल्या शेवटच्या संधीच्या वेळी त्याने दोन्ही डावांत अनुक्रमे १३ आणि १ अशा धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याच्या कामगिरीविषयी सर्वानाच उत्सुकता आहे. पण तो अपयशी ठरल्यास कदाचित मोहालीही त्याची अखेरची कसोटी ठरू शकते.

भारताच्या यष्टिरक्षकाचा शोध घेत असताना सध्या सर्वाधिक चर्चा होते आहे ती दिल्लीच्या १९ वर्षीय रिषभ पंतची. त्याची झंझावाती फलंदाजी डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. त्याने यंदाच्या हंगामातील सहा सामन्यांत १०९च्या सरासरीने एकंदर ८७४ धावा केल्या आहेत. १४६, ३०८, २४, ९, ६०, ११७, १३५, ७५ या खेळी त्याने साकारल्या आहेत. याशिवाय अनेक विक्रम त्याने मोडीत काढले आहेत. आक्रमकता आणि सातत्य हे त्याच्यात प्रमुख गुण आहेत.

मोहाली कसोटीच्या वेळी प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि निवड समितीने रिषभपेक्षा पार्थिवच्या अनुभवाला प्राधान्य दिले. मात्र चालू हंगामात अजून आठ कसोटी सामने भारताला खेळायचे आहेत. त्यामुळे धोनीचे स्थान घेऊ शकेल, अशा पर्यायाचा शोधसुद्धा या प्रवासात कदाचित पक्का होऊ शकेल, अशी आशा आहे.

प्रशांत केणी – prashant.keni@expressindia.com