पीटीआय, दुबई

भारताच्या नितीन मेनन यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) विशेष पंच श्रेणीत (एलिट पॅनल) तब्बल पाचव्यांदा स्थान मिळाले आहे. तसेच शरफुद्दौला इब्ने शाहीद यांचाही विशेष पंच श्रेणीत समावेश करण्यात आला असून हे यश मिळवणारे ते बांगलादेशचे पहिले पंच ठरले आहेत.

इंदूरस्थित मेनन यांना २०२० मध्ये प्रथम ‘आयसीसी’च्या विशेष पंच श्रेणीत स्थान मिळाले होते. त्यानंतर त्यांनी सलग पाचव्यांदा या श्रेणीतील आपले स्थान राखले आहे. एकूण १२ पंचांचा या विशेष श्रेणीत समावेश असून यात मेनन हे एकमेव भारतीय आहेत. ४० वर्षीय मेनन यांनी आतापर्यंत २३ कसोटी, ५८ एकदिवसीय आणि ४१ ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत पंचाची भूमिका पार पाडली आहे. पंच म्हणून एकूण १२२ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेले मेनन आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान एस. वेंकटराघवन यांचा १२५ सामन्यांचा विक्रम मोडू शकतील. मेनन यांनी गेल्या वर्षी अॅशेस मालिकेतही पंच म्हणून काम केले होते. मेनन यांच्यापूर्वी भारताकडून एस. रवी आणि वेंकटराघवन यांनाच विशेष पंच श्रेणीत स्थान मिळवता आले होते.

हेही वाचा >>>हार्दिकच्या योजनांचे आश्चर्य! बुमराच्या वापरावरून स्मिथकडून मुंबई इंडियन्सच्या कर्णधारावर टीका

दुसरीकडे, बांगलादेशच्या शरफुद्दौला यांना विशेष पंच श्रेणीत बढती मिळाली आहे. ते आता निवृत्त झालेल्या मरे इरॅस्मस यांची जागा घेतील. शर्फुदुल्ला यांनी आतापर्यंत १० कसोटी, ६३ एकदिवसीय आणि ४४ ट्वेन्टी-२० सामन्यांत पंचाची भूमिका बजावली आहे. तसेच महिलांच्या १३ एकदिवसीय आणि २८ ट्वेन्टी-२० सामन्यांतही त्यांनी पंच म्हणून काम केले आहे.

दरम्यान, अनुभवी ख्रिास ब्रॉड यांना सामनाधिकाऱ्यांच्या विशेष श्रेणीतून वगळण्यात आले आहे. या श्रेणीत गेल्या वर्षी सात जणांचा समावेश होता, तर यंदा केवळ सहा जणांना स्थान मिळाले आहे. ब्रॉड यांनी १२३ कसोटी, ३६१ एकदिवसीय आणि १३५ ट्वेन्टी-२० सामने, तसेच महिलांच्या १५ ट्वेन्टी-२० सामन्यांत सामनाधिकारी म्हणून काम केले आहे.

हेही वाचा >>>IPL 2024 : राजस्थान रॉयल्सची मोठी घोषणा! प्रसिध कृष्णाच्या जागी लखनऊ फ्रँचायझीच्या ‘या’खेळाडूला केले करारबद्ध

विशेष श्रेणीतील पंच

नितीन मेनन (भारत), कुमार धर्मसेना (श्रीलंका), ख्रिास्तोफर गॅफनी (न्यूझीलंड), मायकल गॉफ (इंग्लंड), अॅड्रियन होल्डस्टॉक (दक्षिण आफ्रिका), रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड), रिचर्ड केटलब्रो (इंग्लंड), अहसान रझा (पाकिस्तान) , पॉल रायफल (ऑस्ट्रेलिया), शरफुद्दौला इब्ने शाहीद (बांगलादेश), रॉड टकर (ऑस्ट्रेलिया), जोएल विल्सन (वेस्ट इंडिज).

विशेष श्रेणीतील सामनाधिकारी

जवागल श्रीनाथ (भारत), डेव्हिड बून (ऑस्ट्रेलिया), जेफ क्रो (न्यूझीलंड), रंजन मदुगले (श्रीलंका), अँडी पायक्रॉफ्ट (झिम्बाब्वे), रिची रिचर्डसन (वेस्ट इंडिज).