पीटीआय, दोहा
भारताचा ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राला दोहा डायमंड लीगमध्ये जेतेपदाने हुलकावणी दिली. शुक्रवारी रात्री झालेल्या या स्पर्धेत नीरजने अखेरच्या प्रयत्नात ८८.३६ मीटरचे अंतर गाठले. मात्र, तो चेक प्रजासत्ताकच्या याकुब वाडलेजच्या विजयी अंतरापेक्षा केवळ दोन सेंटीमीटरने मागे राहिला.
नव्या हंगामातील पहिलीच स्पर्धा खेळत असलेल्या २६ वर्षीय नीरजने वाडलेजला कडवी झुंज दिली. मात्र, वाडलेजने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात गाठलेले ८८.३८ मीटरचे अंतर त्याला जेतेपद मिळवून देण्यासाठी पुरेसे ठरले. नीरजने गेल्या वर्षी या स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. मात्र, या वेळी त्याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. दोन वेळच्या विश्वविजेत्या अँडरसन पीटर्सने ८६.६२ मीटर लांब भालाफेक करत तिसरा क्रमांक मिळवला.
भारताचा अन्य भालाफेकपटू किशोर जेनाचे डायमंड लीगमधील पदार्पण निराशाजनक ठरले. तीन प्रयत्नांनंतरच तो स्पर्धेबाहेर झाला. त्याने सुरुवातीला ७६.३१ मीटरच्या अंतराची फेक केली. त्याचा दुसरा प्रयत्न अपात्र ठरवण्यात आला. तिसऱ्या प्रयत्नात त्याने ७६.३१ मीटरचे अंतर गाठले. मात्र, तीन प्रयत्नांनंतर एकूण १० भालाफेकपटूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत तो नवव्या स्थानी असल्याने त्याचे आव्हान संपुष्टात आले. २८ वर्षीय जेनाने गेल्या वर्षी हांगझो आशियाई क्रीडा स्पर्धेत ८७.५४च्या अंतरासह रौप्यपदकाची कमाई केली होती. ही त्याची कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी होती. डायमंड लीगमध्ये मात्र त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.
हेही वाचा >>>IPL 2024 : कोलकाता प्लेऑफ्समध्ये; मुंबईवर दणदणीत विजयासह बाद फेरी गाठणारा पहिलाच संघ
वाडलेजने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रौप्य, तर गेल्या वर्षीच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते. या दोन्ही स्पर्धांत नीरज सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता. २०२३च्या दोहा डायमंड लीगमध्ये नीरजने ८८.६७च्या अंतरासह जेतेपद पटकावले होते. त्यावेळी त्याने वाडलेजलाच (८८.६३) मागे टाकले होते. यावेळी मात्र त्याचे प्रयत्न अपुरे पडले.
नव्या हंगामातील पहिलीच स्पर्धा खेळ असल्याने नीरजला लय मिळवण्यासाठी झगडावे लागले. त्याला मोठे अंतर गाठणे शक्य होत नव्हते. पहिला प्रयत्न अपात्र ठरविण्यात आल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८४.९३ मीटर अंतरावर भाला फेकला. त्यामुळे तो वाडलेजपाठोपाठ दुसऱ्या स्थानी पोहोचला. तिसऱ्या प्रयत्नात त्याने आपली कामगिरी सुधारताना ८६.२४ मीटरचे अंतर गाठले. त्याच वेळी वाडलेजने ८८.३८ मीटरवर भाला फेकत अग्रस्थान भक्कम केले. पुढील दोन फेऱ्यांमध्ये नीरजने अनुक्रमे ८६.१८ आणि ८२.२८ मीटरचे अंतर गाठले. अखेरच्या प्रयत्नात नीरजचा भाला ८८.३८ मीटरच्या अंतरापर्यंत पोहोचला. परंतु त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
आता फेडरेशन चषकात सहभाग
नीरज आता तीन वर्षांत प्रथमच मायदेशात स्पर्धा खेळणार आहे. तो भुवनेश्वर येथे आजपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेत सहभाग नोंदवेल. त्याला या स्पर्धेत किशोर जेना आणि डीपी मनू यांचे आव्हान असेल. या स्पर्धेत भालाफेक क्रीडा प्रकाराची पात्रता फेरी १४ मे, तर अंतिम फेरी १५ मे रोजी खेळवण्यात येईल. चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत अन्य आघाडीचे भारतीय क्रीडापटूही आपले कौशल्य पणाला लावतील. गोळाफेकपटू तजिंदरपाल सिंग तूरसह अन्य काही भारतीय खेळाडूंचा पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवण्याचा प्रयत्न असेल
भालाफेकीचा समावेश असलेला डायमंड लीगचा पुढील टप्पा ७ जुलैला पॅरिसमध्ये होणार आहे. या वर्षी पॅरिस ऑलिम्पिक ही माझ्यासाठी सर्वांत मोठी स्पर्धा असेल. मात्र, डायमंड लीगही खूप महत्त्वाची स्पर्धा आहे. यंदाच्या हंगामातील माझी ही पहिलीच स्पर्धा होती. त्यामुळे सुरुवातीला लय मिळवणे थोडे अवघड गेले. मला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले असले, तरी मी विजेत्यापेक्षा केवळ दोन सेंटीमीटरच्या अंतरानेच मागे होतो. आता पुढील डायमंड लीगमध्ये मोठे अंतर गाठून जेतेपद मिळवण्याचे माझे लक्ष्य असेल. मला कतारमध्ये भारतीय चाहत्यांचा खूप पाठिंबा लाभला. त्यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत. – नीरज चोप्रा.