पुरुष एकेरीत लक्ष्य सेनची प्रणॉयवर मात

India Open Badminton Tournament नवी दिल्ली : भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची मंगळवारी सुरुवात सनसनाटी झाली. संभाव्य विजेत्यांच्या शर्यतीत सर्वाधिक पसंती मिळालेल्या भारताच्याच पी. व्ही. सिंधूला पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने आपला भारतीय सहकारी एचएस प्रणॉयवर मात केली.

जागतिक क्रमवारीत ३०व्या स्थानावर असणाऱ्या थायलंडच्या सुपानिदा कातेथाँगने सातव्या स्थानावरील सिंधूचा २१-१२, २२-२० असा पराभव केला. गेल्या वर्षी सुपानिदानेच उपांत्य फेरीत सिंधूला पराभूत केले होते. राष्ट्रकुल स्पर्धेत उद्भवलेल्या घोटय़ाच्या दुखापतीनंतर सलग दुसऱ्या स्पर्धेत सिंधूला पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला. तिने मलेशिया स्पर्धेतही पहिल्याच फेरीत आव्हान गमावले होते.

पुरुष एकेरीत लक्ष्यने प्रणॉयला २१-१४, २१-१५ असे नमवले. या विजयासह लक्ष्यने मलेशिया स्पर्धेतील पराभवाची परतफेडही केली. पुरुष दुहेरीत सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी जोडीने डेन्मार्कच्या ख्रिस्तोफर-मॅथ्यू ग्रिमले जोडीचा २१-१३, २१-१५ असा पराभव केला. महिला दुहेरीत ट्रिसा जॉली-गायत्री गोपीचंद यांनी मार्गोट लॅम्बर्ट-ॲन त्रान जोडीला २२-२० १७-२१, २१-१८ असे नमवले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सायनाची विजयी सुरुवात
सायना नेहवालने इंडिया खुल्या स्पर्धेची विजयी सुरुवात केली. सायनाने तीन गेमपर्यंत रंगलेल्या महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डला २१-१७, १२-२१, २१-१९ असे नमवले.