India Qualified for Women’s ODI WC Semi final: भारताच्या महिला संघाने न्यूझीलंडचा पराभव करत वनडे विश्वचषक २०२५ च्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडचा ५३ धावांनी पराभव केला, स्मृती मानधना व प्रतिका रावलची २१२ धावांची भागीदारी आणि दोघींच्या शतकी खेळी सामन्याच्या विजयात महत्त्वाच्या ठरल्या. यासह ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि भारत हे संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरले आहे.
भारतीय संघाने अटीतटीच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारला. टीम इंडियाने ३ बाद ३४० धावा केल्या, जी भारताची वनडे वर्ल्डकपमधील सर्वात मोठी धावसंख्या आहे. पावसाच्या उपस्थितीमुळे डीएलएस पद्धतीने न्यझीलंडला विजयासाठी ३२५ धावांचं लक्ष्य मिळालं.
पावसाच्या व्यत्ययामुळे सामना ४४ षटकांचा झाल्याने न्यूझीलंडला विजयासाठी ३२५ धावांचं आव्हान देण्यात आलं. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाची सुरूवात चांगली झाली नाही. दुसऱ्याच षटकात सुझी बेट्सला क्रांती गौडने झेलबाद केलं. तर जॉर्जिया प्लाईमर ३० धावा व सोफी डिव्हाईन ६ धावा करत रेणुका सिंगच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाल्या. तर अमेलिया कर ४५ धावांवर स्नेह राणाच्या गोलंदाजीवर बाद झाली. यानंतर श्रीचरणीने ८१ धावांवर खेळत असलेल्या हॅलिडेला झेलबाद केलं. तर मॅडी ग्रीन १८ धावांवर बाद झाली.
इसाबेल गेज ६५ धावा करत नाबाद राहिली. भारताकडून रेणुका सिंग ठाकूर व क्रांती गौड यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर स्नेह राणा, श्रीचरणी, दीप्ती शर्मा व प्रतिका रावल यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय मात्र भारताच्या पथ्यावर पडला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद ३४० धावा केल्या. ही भारताची वनडे वर्ल्डकपमधील सर्वात मोठी धावसंख्या आहे. या धावसंख्येत भारताच्या टॉप फलंदाजी फळीने मोठं योगदान दिलं.
स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी पहिल्या विकेटसाठी २१२ धावांची विक्रमी भागीदारी रचली. प्रतिका रावलने १३४ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांसह १२२ धावांची खेळी केली. तर स्मृती मानधनाने अनेक विविध विक्रम आपल्या नावे करत ९५ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांसह १०९ धावा केल्या. त्यानंतर जेमिमा रोड्रिग्जने वादळी फलंदाजी करत ५५ चेंडूत ११ चौकारांसह ७६ धावांची खेळी केली. तर हरमनप्रीतने १० तर रिचा घोषने ४ धावांचं योगदान दिलं. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्याने डीएलएस पद्धतीमुळे सामना ४४ षटकांचा करण्यात आला आणि न्यूझीलंडला विजयासाठी ३२५ धावांचं आव्हान दिलं.