पीटीआय, बंगळूरु
अलीकडच्या काळात कमालीचे सातत्य राखून खेळणाऱ्या भारतीय फुटबॉल संघासमोर आज, शनिवारी सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत लेबननचे आव्हान असेल. भारताची या लढतीत कर्णधार आणि तारांकित आघाडीपटू सुनील छेत्रीवरच भिस्त असेल.भारताने ‘अ’, तर लेबननने ‘ब’ गटातून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. भारताने साखळी फेरीत पाकिस्तान आणि नेपाळ संघांवर विजय मिळवले, तर कुवेतविरुद्धच्या लढतीत त्यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले. मात्र, सरस गोलसरासरीमुळे कुवेतने ‘अ’ गटातून अव्वल स्थान मिळवले. लेबनन संघ ‘ब’ गटातून आपले सर्व सामने जिंकत अव्वल स्थानी राहिला.
नेपाळविरुद्ध भारताच्या क्षमतेची कसोटी लागली होती. कुवेतविरुद्धच्या सामन्याने त्यात भर पडली. मात्र, प्रत्येक वेळेस छेत्रीच्या गोलने भारताला तारून नेले. छेत्रीची दर्जेदार कामगिरी हीच भारतीय संघाची खरी ताकद आहे. त्याने या स्पर्धेतील आतापर्यंतच्या तीन सामन्यांत पाच गोल नोंदवले आहेत. त्याने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध हॅट्ट्रिक केली होती. मात्र, लेबननचे तगडे आव्हान परतवण्यासाठी त्याला इतरांची साथ गरजेची आहे. सहल अब्दुल समाद, उदांता सिंह आणि महेश सिंह यांना खेळ उंचवावा लागणार आहे.
लेबनन संघाचे स्पर्धेवर निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. त्यांनी तीनही साखळी सामने जिंकताना सात गोल केले आणि प्रतिस्पर्धी संघाला केवळ एक गोल करू दिला आहे. मात्र, गेल्याच महिन्यात आंतरखंडीय स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने लेबननचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते. त्यामुळे भारतीय संघ आत्मविश्वासानिशी मैदानात उतरेल.
स्टिमॅच यांच्यावर दोन सामन्यांची बंद
सॅफ स्पर्धेतील कुवेतविरुद्ध अखेरच्या साखळी सामन्यात लाल कार्ड मिळाल्याने भारताचे प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांच्यावर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. तसेच सॅफ शिस्तपालन समितीने त्यांना ५०० डॉलरचा दंडही ठोठावला आहे. स्टिमॅच यांना पाकिस्तानविरुद्धच्या लढतीतही लाल कार्ड मिळाले होते.
माझा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना कधी असणार हे आताच सांगणे अवघड आहे. फार पुढचा विचार करणे मला पसंत नाही. मी केवळ पुढील सामना, पुढील १० दिवस यांचाच विचार करतो. मी भारतीय संघासाठी यापुढे योगदान देऊ शकत नाही असे वाटेल, त्या दिवशी मी फुटबॉलला अलविदा करेन. – सुनील छेत्री, भारताचा कर्णधार
वेळ : सायं. ७.३० वा.
थेट प्रक्षेपण : फॅनकोड अॅप