दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज पहिला एकदिवसीय सामना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीटीआय, पर्ल

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बुधवारी रंगणाऱ्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात विराट कोहली फलंदाज म्हणून कशी छाप पाडतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे. गेल्या सात वर्षांत प्रथमच कोहलीवर नेतृत्वाची जबाबदारी नसली, तरी नवा कर्णधार के. एल. राहुलसाठी त्याचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका १-२ अशा फरकाने गमवावी लागली. त्यानंतर कोहलीने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. डिसेंबरमध्ये त्याची एकदिवसीय संघाच्या नेतृत्वपदावरूनही हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून एकही शतक झळकावू न शकलेल्या कोहलीला पूर्वीप्रमाणे फलंदाजी करताना पाहण्यासाठी क्रीडाप्रेमी उत्सुक आहेत. तेम्बा बव्हूमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या संघात क्विटंन डीकॉकचे पुनरागमन झाल्यामुळे त्यांची फलंदाजी बळकट झाली आहे. परंतु वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाने खेळाच्या ताणाचे व्यवस्थापन करण्याच्या हेतूने या मालिकेतून माघार घेतली आहे.

कोहलीने संघाचा दर्जा वाढवला -राहुल

कोहलीने कर्णधार म्हणून भारतीय क्रिकेट आणि खेळाडूंचा दर्जा वाढवला असून हा स्तर कायम राखणे गरजेचे असल्याचे मत राहुलने व्यक्त केले. तसेच आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत पहिल्यांदा भारताच्या एकदिवसीय संघाचे कर्णधारपद भूषवण्यासाठी उत्सुक असल्याचेही तो म्हणाला. ‘‘विराटच्या नेतृत्वात भारतीय संघाने अभूतपूर्व यश संपादले. आम्ही प्रत्येक देशात जाऊन मालिका जिंकल्या, जे यापूर्वी घडले नव्हते. तो कर्णधार असताना भारतीय क्रिकेटमध्ये अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या,’’ असे राहुलने नमूद केले.

राहुलच्या नेतृत्वाची कसोटी

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत प्रथमच भारताच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या राहुलची या वेळी दुहेरी कसोटी लागेल. राहुल सलामीला येणार हे स्पष्ट असून त्याच्या सोबतीला अनुभवी शिखर धवनला प्राधान्य देण्यात येईल. त्यामुळे महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला पदार्पणासाठी प्रतीक्षा करावी लागेल. मधल्या फळीत कोहली, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत असा फलंदाजीचा क्रम असू शकतो. अशा स्थितीत सूर्यकुमार यादवला संघाबाहेर राहावे लागेल.

व्यंकटेशला पदार्पणाची संधी

हार्दिक पंडय़ा सातत्याने अपयशी ठरल्यामुळे संघातील अष्टपैलू खेळाडूचे स्थान पक्के करण्याची व्यंकटेश अय्यरला नामी संधी आहे. त्याचे बुधवारी एकदिवसीय पदार्पण सुनिश्चित मानले जात आहे. राहुलने पत्रकार परिषदेदरम्यान दोन फिरकीपटूंना खेळवण्याचे संकेत दिले. त्यामुळे रविचंद्रन अश्विन आणि यजुर्वेद्र चहल फिरकीची धुरा वाहतील. उपकर्णधार जसप्रीत बुमरा वेगवान माऱ्याचे नेतृत्व करेल. अन्य दोन वेगवान गोलंदाजांच्या जागांसाठी शार्दूल ठाकूर, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार आणि प्रसिध कृष्णा यांच्यात चुरस आहे.

८४ उभय संघांत आतापर्यंत झालेल्या ८४ एकदिवसीय सामन्यांपैकी भारताने ३५, तर आफ्रिकेने ४६ लढती जिंकल्या आहेत. तीन सामने रद्द झाले आहेत. ९ विराट कोहलीला (५,०५७) परदेशांतील एकदिवसीय सामन्यांत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्यासाठी नऊ धावांची गरज आहे. सचिन तेंडुलकर (५,०६५) या यादीत पहिल्या स्थानी आहे.३ यजुर्वेद्र चहलला एकदिवसीय कारकीर्दीतील १०० बळींचा टप्पा गाठण्यासाठी ३ बळींची आवश्यकता आहे.

संघ

  • भारत : के. एल. राहुल (कर्णधार), विराट कोहली, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, शार्दूल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यजुर्वेद्र चहल, जयंत यादव, नवदीप सैनी, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, प्रसिध कृष्णा.
  • दक्षिण आफ्रिका : तेम्बा बव्हूमा (कर्णधार), क्विंटन डीकॉक, झुबेर हम्झा, जानेमल मलान, एडिन मार्करम, रासी व्हॅन डर दुसेन, डेव्हिड मिलर, केशव महाराज, मार्को जॅन्सन, सिसांडा मगाला, वेन पार्नेल, लुंगी एन्गिडी, जॉर्ज लिंडे, अँडीले फेहलुकवायो, ड्वेन प्रीटोरियस, तबरेझ शम्सी, कायले व्हेरेने.
  • वेळ : दुपारी २ वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदूी (संबंधित एचडी वाहिन्यांवर)
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India south africa series now look batsman kohli ysh
First published on: 19-01-2022 at 02:24 IST