नागपूर : प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराच्या तंदुरुस्तीबाबत संभ्रम कायम असून शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात त्याच्या उपलब्धतेची भारतीय संघाला आशा आहे. पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताने दुसऱ्या सामन्यात विजयी पुनरागमन करणे गरजेचे आहे. हा सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर रंगणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुमराला गेल्या काही काळापासून दुखापतींनी सतावले आहे. पाठीच्या दुखापतीमुळे त्याला या महिन्यात झालेल्या आशिया चषक स्पर्धेला मुकावे लागले होते. त्याने बंगळूरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत या दुखापतीवर उपचार घेतले. त्यानंतर ‘बीसीसीआय’च्या वैद्यकीत पथकाने त्याला तंदुरुस्त ठरवल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली. मात्र, मोहाली येथे झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात त्याला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान न मिळाल्याचे सर्वानाच आश्चर्य वाटले. त्यामुळे त्याच्या तंदुरुस्तीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परंतु बुमरा दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात खेळणार असल्याचे कर्णधार रोहित शर्माने सांगितले होते. त्यामुळे त्याचे पुनरागमन झाल्यास संघाला मोठा दिलासा मिळेल.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा दमदार कामगिरी सुरू ठेवत दुसरा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी मिळवण्याचा प्रयत्न असेल. या सामन्यादरम्यान दव पडण्याची शक्यता असल्याने नाणेफेक जिंकणारा संघ धावांचा पाठलाग करण्याला प्राधान्य देऊ शकेल.

’ वेळ : सायं. ७ वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, १ हिंदी

गोलंदाजीची चिंता

भारतीय संघाला सध्या गोलंदाजीची चिंता आहे. पहिल्या सामन्यात २०८ धावांची मजल मारल्यानंतरही भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. भुवनेश्वर कुमार (चार षटकांत ५२ धावा) आणि हर्षल पटेल (चार षटकांत ४९ धावा) हे प्रमुख वेगवान गोलंदाज अपयशी ठरले. तसेच लेग-स्पिनर यजुर्वेद्र चहलने एक बळी मिळवला, पण त्यासाठी ४२ धावा दिल्या. केवळ अक्षर पटेलला (३/१७) प्रभावी मारा करता आला. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात बुमरासह रविचंद्रन अश्विनचे भारतीय संघात पुनरागमन होऊ शकेल. फलंदाजीची भिस्त पहिल्या सामन्यातील अर्धशतकवीर केएल राहुल, कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्यावर असेल. अष्टपैलू हार्दिक पंडय़ाने पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावत सर्वानाच प्रभावित केले.मात्र, त्याच्या गोलंदाजीत सुधारणेला वाव आहे.

सामन्यावर पावसाचे सावट!

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नागपूर येथे होणाऱ्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यावर पावसाचे सावट आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूरमध्ये संततधार सुरू असून शुक्रवारीही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सामन्यासाठी सर्व ४५ हजार तिकिटांची विक्री झाली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India target strong comeback against australia in 2nd t20i in nagpur zws
First published on: 23-09-2022 at 05:34 IST