Women’s World Cup semifinals confirmed After AUSW vs SAW Match: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड व भारत हे संघ स्पर्धेच्या सेमीफायनलसाठी पात्र ठरले. ऑस्ट्रेलिया संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेला संघ आहे आणि त्यांनी सर्वात आधी स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली. त्यानंतर दक्षिण आफ्रिका, इंग्लंड व टीम इंडिया या संघांनी पात्रता मिळवली. आता भारतीय संघ सेमीफायनलमध्ये कोणत्या संघाविरूद्ध खेळणार हे निश्चित झालं आहे.

महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चा २६ वा सामना दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यात खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला २४ षटकांत ९७ धावांवर गुंडाळलं आणि त्यानंतर १६.५ षटकांत ३ बाद ९८ धावा करून चॅम्पियन कांगारू संघाने ७ विकेट्सने सामना जिंकला.

ऑस्ट्रेलियाचा स्पर्धेतील शेवटचा सामना होता आणि त्यांनी हा सामना जिंकून दोन गुण मिळवले. या दोन गुणांसह, ऑस्ट्रेलियाचे आता १३ गुण झाले आहेत आणि ते गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहेत. कांगारू संघाने या हंगामात सात सामने खेळले, त्यापैकी सहा सामने जिंकले आणि एक सामना बरोबरीत सुटला. या सामन्यासह संघ लीग टप्प्यात अपराजित राहिला.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करल्यानंतर, दक्षिण आफ्रिका १० गुणांसह वर्ल्डकप स्पर्धेच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे, तर इंग्लंड ९ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडला अजून एक सामना खेळायचा आहे आणि त्यांना दुसऱ्या स्थानावर जाण्याची संधी आहे, तर भारत सहा गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

भारतीय संघ सेमीफायनलचा सामना कोणत्या संघाविरूद्ध खेळणार?

भारताचे सध्या ६ गुण आहेत आणि टीम इंडियाने जरी त्यांचा पुढचा सामना जिंकला तरी ते गुणतालिकेत ८ गुणांसह चौथ्या स्थानावर कायम राहतील. कोणताच संघ गुणांच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाला मागे टाकू शकणार नाही आणि ते पहिल्या स्थानावरच राहतील. उपांत्य फेरीत, गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या संघाचा सामना चौथ्या स्थानावर असलेल्या संघाशी होतो. त्यामुळे भारताचा सामना सेमीफायनलमधील सामना ऑस्ट्रेलियाशी होईल. आता भारताचा सामना सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध होईल हे निश्चित झालं आहे. ३० ऑक्टोबर रोजी होणारा हा सेमीफायनल सामना डी वाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे.