भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सहा सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना १२४ धावांनी जिंकला. या विजयाबरोबरच भारताने या मालिकेमध्ये ३-० अशी अभेद्य आघाडी मिळवली आहे. १६० धावांच्या नाबाद खेळीसाठी कर्णधार विराट कोहलीला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.

पहिल्या डावात कर्णधार विराट कोहलीचं नाबाद दीडशतक आणि त्याला सलामीवीर शिखर धवननेच्या तगड्या फलंदाजीमुळे भारताने ३०० धावांचा टप्पा ओलांडून आफ्रिकेसमोर ३०४ धावांच आव्हान ठेवलं होतं. आफ्रिकेने धावांचा पाठलाग करताना सुरुवात चांगली केली. हाशीम आमला स्वस्तात परतल्यानंतर जे. पी. ड्युमिनी आणि एडन मार्क्रम जोडीने आफ्रिकेचा डाव सावरला. दोघांमध्येही दुसऱ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी. ही एकमेव भागीदारी वगळता आफ्रिकन संघाला चांगल्या भागीदारी उभारण्यात अपयश आले आणि थोड्या थोड्या वेळाने भारतीय संघाला विकेट्स मिळत गेल्या. यामध्ये प्रामुख्याने मागील सामन्याप्रमाणे यावेळीही कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलच्या या फिरकी जोडगोळीसमोर आफ्रिकन संघाने नांगी टाकली. दीडशे धावांचा टप्पा पार केल्यानंतर अवघ्या २९ धावांच्या मोबदल्यात या दोघांनी ४ गड्यांना बाद करत सामना भारताच्या खिशात घातला. १२९ वर आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर पुढील ५० धावांमध्ये आफ्रिकेचा डाव संपला यावरूनच भारतीय फिरकी गोलंदाजांनी कशाप्रकारे टिच्चून गोलंदाजी केली याचा अंदाज येतो. चहालने ९ षटकांमध्ये ४६ धावांच्या मोबदल्यात चार खेळाडू तंबूत पाठवले तर कुलदीपने अवघ्या २३ धावांच्या मोबदल्यात चार गडी बाद करत भारताचा विजय सोप्पा केला.

त्याआधी विराट कोहली पहिल्या डावात भारताचा खऱ्या अर्थाने हिरो ठरला. त्याने १२ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने नाबाद १६० धावा ठोकल्या. विराटने दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांना आपल्या चौफेर फटकेबाजीमुळे सळो की पळो करुन सोडलं. आफ्रिकेचा एकही गोलंदाज विराटच्या धावांवर अंकुश लावू शकला नाही. या खेळीसाठी विराटला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. दक्षिण आफ्रिकेकडून जे. पी. ड्यूमिनीने २ बळी टिपले. मात्र यजमान संघातील इतर गोलंदाजांना फारसं यश मिळालं नाही.

प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ अधिच कमकुवत झालेला आहे. क्विंटन डी-कॉक, फाफ डु प्लेसिस, डिव्हीलियर्स यांसारखे फलंदाज सध्या संघामध्ये नसल्यामुळे आफ्रिकेचा संघाला सलग तीन सामने गमावावे लागले आहेत. ३-० अशी अभेद्य आघाडी मिळवल्यामुळे आता पुढील तिन्ही सामन्यांत चांगली कामगिरी करण्याचा दबाव आफ्रिकन संघावर असेल तर भारतीय संघ पुढील तिन्ही सामने जिंकून मालिका निर्विवादपणे वर्चस्व मिळवत खिशात टाकण्याच्या विचारात असेल.

  • भारताने १२४ धावांनी सामना जिंकला.
  • आफ्रिकेचा डाव गडगडला, भारत विजयापासून एक विकेट दूर
  • आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत, मिलर परतला
  • मात्र चहलच्या गोलंदाजीवर ड्युमिनी माघारी, आफ्रिकेला चौथा धक्का
  • जे. पी. ड्युमिनीचं अर्धशतक, ड्युमिनीकडून आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • पाठोपाठ यष्टीरक्षक क्लासन चहलच्या गोलंदाजीवर माघारी, आफ्रिकेचा तिसरा गडी माघारी
  • कुलदीप यादवने आफ्रिकेची जमलेली जोडी फोडली, एडन मार्क्रम यष्टीचीत
  • दोघांमध्येही दुसऱ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी
  • जे. पी. ड्युमिनी आणि एडन मार्क्रम जोडीने आफ्रिकेचा डाव सावरला
  • दक्षिण आफ्रिकेची अडखळती सुरुवात, हाशिम आमला एक धाव काढून माघारी
  • आफ्रिकेला विजयासाठी ३०४ धावांचं आव्हान, कोहलीच्या नाबाद १६० धावा
  • एक षटकार आणि एक चौकाराच्या मदतीने भारताची धावसंख्या ३०० पार
  • शेवटच्या दोन चेंडुमध्ये विराट कोहलीची फटकेबाजी
  • कोहलीच्या सामन्यात १५० धावा पूर्ण
  • सातव्या विकेटसाठी दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी
  • भुवनेश्वर कुमार आणि विराट कोहलीने भारताचा डाव परत सावरला
  • अवघी एक धाव काढून केदार जाधव बाद, भारताचे ६ गडी तंबूत परतले
  • केदार जाधवही मिळालेल्या संधीचं सोनं करण्यात अपयशी
  • भारताचा निम्मा संघ माघारी
  • इम्रान ताहीरच्या गोलंदाजीवर एन्जिडीकडे झेल देत धोनी बाद
  • धोनी – कोहलीची भागीदारी फोडण्यात आफ्रिकेला यश
  • कर्णधार विराट कोहलीचं शतक, भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल
  • कोहली – धोनी जोडीने भारताचा डाव सावरला
  • मात्र ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक क्लासेनकडे झेल देत पांड्या माघारी
  • हार्दिक पांड्या – विराट कोहलीकडून डाव सावरण्याचा प्रयत्न
  • ड्युमिनीचा भारताला सलग दुसरा दणका, भारताचे ३ गडी माघारी
  • अजिंक्य रहाणेही मोठा फटका खेळण्याच्या नादात माघारी
  • शिखर धवन ७६ धावांवर माघारी
  • अखेर ड्युमिनीच्या गोलंदाजीवर शिखर धवन माघारी, भारताची जमलेली जोडी फुटली
  • शिखर धवन – विराट कोहलीमध्ये दुसऱ्या विकेटसाठी १४० धावांची भागीदारी
  • कर्णधार विराट कोहलीचंही अर्धशतक, भारताची सामन्यावर मजबूत पकड
  • पहिल्या विकेटसाठी विराट कोहली – शिखर धवनमध्ये १०० धावांची भागीदारी
  • शिखर धवनचं आक्रमक अर्धशतक, भारताचा डाव सावरला
  • भारताने ओलांडला ५० धावसंख्येचा टप्पा
  • पंचांनी विराटला बाद ठरवलं, मात्र तिसऱ्या पंचांच्या पाहणीत विराटला जीवदान
  • रबाडाच्या गोलंदाजीवर विराट कोहली पायचीत असल्याचं अपील
  • भारताला पहिला झटका, रोहित शर्मा शून्यावर बाद
  • तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात कोणतेही बदल नाहीत
  • आफ्रिकेने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय