भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातली कसोटी मालिका आफ्रिकेने जिंकली असली तरीही, जोहान्सबर्ग कसोटीत दोन्ही बाजूच्या फलंदाजांची उडणारी दाणादाण हा सध्या चर्चेचा विषय बनली आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही जोहान्सबर्गच्या खेळपट्टीबद्दल आपली नाराजी व्यक्त करुन आयसीसीला या प्रकरणात लक्ष घालण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा महत्वाचा फलंदाज हाशिम आमला यानेही जोहान्सबर्गची खेळपट्टी फलंदाजीसाठी खडतर असल्याचं मान्य केलं आहे.

“माझ्या दृष्टीने जोहान्सबर्गची खेळपट्टी आतापर्यंत फलंदाजीसाठी सर्वात कठीण खेळपट्टी आहे. काही महिन्यांपूर्वी आम्ही इंग्लंडमध्ये खेळलो, तिकडेही अशाच स्वरुपाच्या खेळपट्ट्या होत्या. मात्र जोहान्सबर्गच्या मैदानावर फलंदाजी करताना काल आमची चांगलीच कसोटी लागली.” दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत हाशिम आमलाने पत्रकारांशी संवाद साधला. अशाप्रकारच्या खेळपट्टींवर आपली विकेट वाचवून फलंदाजी करणं हे आव्हानात्मक काम असल्याचंही आमलाने मान्य केलं.

अवश्य वाचा – जोहान्सबर्गच्या खेळपट्टीवर सौरव गांगुली नाराज, आयसीसीला चौकशी करण्याची विनंती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या खेळपट्टीचा अंदाज लावणं कठीण जात आहे. कोणता चेंडू मध्येच उसळी घेईल आणि कोणता चेंडू स्विंग होईल हे कळत नसल्यामुळे फलंदाजांसाठी या मैदानावर धावा करणं ही आव्हानात्मक बाब होऊन बसली आहे. मात्र गोलंदाज या खेळपट्टीचा चांगला फायदा उचलत आहेत, आमला जोहान्सबर्गच्या खेळपट्टीवर आपलं मत मांडत होता. पहिल्या डावात हाशिम आमलाने १२१ चेंडुंमध्ये ६१ धावांची संयमी खेळी केली. आमलाच्या अर्धशतकी खेळीमुळेत आफ्रिकेला भारतावर ७ धावांची नाममात्र आघाडी घेता आली होती. त्यामुळे उरलेल्या दिवसांमध्ये जोहान्सबर्गची खेळपट्टी नेमके काय रंग दाखवते हे पहावं लागणार आहे.