भारतीय कसोटी संघातला सध्याच्या घडीचा सर्वात चांगला फलंदाज कोण, तर अनेक जणं कोणताही किंतू-परंतू मनात न ठेवता चेतेश्वर पुजाराचं नाव घेतील. राहुल द्रविडने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर संघात तिसऱ्या क्रमांकाच्या जागेला वारसदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला होता, मात्र चेतेश्वर पुजाराने आपलं नाणं खणखणीत वाजवत या जागेचा सातबारा जणू आपल्या नावेच केला आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यानंतर धावांचा ओघ सतत चालू ठेवणं आणि प्रत्येक मॅचगणिक चांगली कामगिरी करत राहणं यामुळे चेतेश्वर पुजारा भारतीय संघाचा अनभिषिक्त सम्राट बनला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात उद्यापासून म्हणजेच ३ ऑगस्टला कोलंबोच्या मैदानात दुसरा कसोटी सामना सुरु होतो आहे. हा चेतेश्वर पुजाराच्या कसोटी कारकिर्दीतला ५० वा कसोटी सामना असणार आहे. पुजाराच्या खेळीत तुम्हाला कधीही अवास्तव आक्रमकता दिसणार नाही, किंवा मैदानात त्याच्या वागण्यामध्येही विराट कोहलीसारखा आक्रस्ताळेपणा जाणवणार नाही. शांतपणे राहुन आपलं काम चोखपणे बजावायचं हे चेतेश्वर पुजाराला जमतं, आणि याच गुणामुळे तो भारताच्या कसोटी संघाचा अविभाज्य भाग बनला आहे.

पुजाराने आतापर्यंत कसोटी कारकिर्दीत ३९६६ धावा काढल्या असून यामध्ये १२ शतकं आणि १५ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे या ऐतिहासीक पार्श्वभूमीवर आपण पुजाराच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतल्या ५ महत्वाच्या खेळींवर प्रकाशझोत टाकणार आहोत.

१. भारत विरुद्ध इंग्लंड, मुंबई, दुसरी कसोटी – १३५ धावा

४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना जिंकून भारताने मोठ्या झोकात सुरुवात केली होती. मात्र दुसऱ्या कसोटीत इंग्लंडने टिच्चून मारा करत सामन्यात पुनरागमन केलं. एका क्षणाला भारताची अवस्था १६९/६ अशी होती, मात्र यावेळी चेतेश्वर पुजारा भारतासाठी धावून आला.

विरेंद्र सेहवागसोबत ४८, विराट कोहलीसोबत ५८ आणि एमएस धोनीसोबत ५० धावांची भागीदारी करत चेतेश्वरने भारतीय संघाला आकार दिला. मात्र हे सर्व फलंदाज बाद झाल्यानंतर पुजाराला भक्कम साथ मिळण्याची गरज होती. मग रविचंद्रन अश्विनने पुजाराला साथ देत भारताला आश्वासक धावसंख्या उभारण्यात मदत केली. यादरम्यान पुजाराने आपलं शतकही साजरं केलं आणि भारताला ३२७ धावांची धावसंख्याही उभारुन दिली.

२. भारत विरुद्ध श्रीलंका, कोलंबो कसोटी – नाबाद १४५ धावा

२०१५ साली भारताचा श्रीलंका दौरा कोणताही खेळाडू विसरु शकणार नाही. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी झाल्यानंतर कोलंबो कसोटीत दोन्ही संघ मालिका विजयाच्या दृष्टीने मैदानात उतरले होते. मात्र या कसोटीतली श्रीलंकन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजीला खिंडार पाडत भारताची अवस्था १७३/६ अशी केली. यावेळी भारताच्या सर्व रथी-महारथी फलंदाजांना श्रीलंकन गोलंदाजांनी तंबूचा रस्ता दाखवला, मात्र पुजाराने एका बाजूने किल्ला लढवत श्रीलंकन आक्रमणाचा नेटाने सामना केला.

या सामन्यात सर्वात महत्वाचा टर्निंग पॉईंट ठरला तो म्हणजे चेतेश्वर पुजाराने तळातल्या अमित मिश्रासोबत केलेली १०४ धावांची भागिदारी. या खेळीमुळे श्रीलंकेचा संघ बॅकफूटवर गेलेला पहायला मिळाला.

मिश्रानेही या सामन्यात अर्धशतक झळकावलं, तर पुजारा १४५ धावांवर नाबाद राहिला आणि अखेर भारताने कोलंबो कसोटी ११७ धावांनी जिंकत मालिका २-१ अशा फरकाने आपल्या खिशात घातली.

३. भारत विरुद्ध न्यूझीलंड, कोलकाता कसोटी, ८७ धावा

२०१५ भारतात पार पडलेल्या या मालिकेत, कोलकाता कसोटीत पुजाराने शतक साजरं केलं नाही. मात्र त्याच्या या खेळीमुळे भारताने न्यूझीलंडवर मालिका विजय संपादीत केला.

शिखर धवन, मुरली विजय आणि विराट कोहली लागोपाठ बाद झाल्यानंतर भारताची अवस्था सामन्यात ४६/३ अशी झाली होती. मात्र यावेळी अजिंक्य रहाणेच्या सोबतीने पुजाराने भारताचा डाव सावरला आणि संघाची अधिक पडझड होणार नाही याची काळजीही घेतली. यानंतर भारतीय संघाने ही कसोटी १७८ धावांनी जिंकत मालिकाही आपल्या खिशात घातली होती.

४. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, बंगळुरु कसोटी – ९२ धावा

२०१७ या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. पहिली कसोटी गमावल्यामुळे दुसऱ्या कसोटीत भारतीय संघावर दबाव होता. दुसऱ्या कसोटीतही कांगारुंनी भारतीय फलंदाजांना १८९ धावांमध्ये ऑलआऊट केलं. मात्र त्याला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाच्या संघालाही फार मोठी आघाडी घेता आली नाही, ऑस्ट्रेलियाचा संघ २७६ धावांवर ऑलआऊट झाला होता.

या कसोटीत चेतेश्वर पुजारा ९२ आणि अजिंक्य रहाणे ५२ यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाने चांगली कामगिरी केली नव्हती. पुजाराने केलेली ९२ धावांची झुंजार खेळी आणि मग त्याला गोलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर भारताने ही कसोटी जिंकत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली होती.

५. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, रांची कसोटी, २०२ धावा

२०१७ सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रांची कसोटीत पुजाराने केलेली २०२ धावांची खेळी ही त्याच्या आतापर्यंतच्या करियरमधली सर्वोत्तम खेळींपैकी एक मानली जाते. आणखी एका कारणासाठी पुजाराने केलेली २०२ धावांची खेळी महत्वाची ठरली आहे. २०२ धावा करण्यासाठी चेतेश्वर पुजाराने तब्बल ५२५ चेंडुंचा सामना केला. या खेळीमुळे एका डावात सर्वात जास्त चेंडुंचा सामना करणारा चेतेश्वर पुजारा हा पहिला भारतीय फलंदाज ठरला होता.

पुजाराच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर ६०३/९ धावांचा डोंगर उभा केला. ऑस्ट्रेलियाने हा सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं असलं तरीही पुजाराने केलेली खेळीही तितकीच महत्वाची ठरते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India tour of sri lanka cheteshwar pujara to play his 50th test tomorrow quick recap of his best 5 innings in test history
First published on: 02-08-2017 at 15:52 IST