पीटीआय, ब्रिस्बेन
पहिल्या चार दिवसांप्रमाणेच अखेरच्या दिवशीही पावसाने निर्णायक भूमिका बजावल्याने यजमान ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात ब्रिस्बेन येथे झालेला तिसरा कसोटी क्रिकेट सामना अपेक्षेप्रमाणे अनिर्णित राहिला. त्यामुळे बॉर्डर-गावस्कर करंडकासाठीच्या या मालिकेतील १-१ अशी बरोबरी कायम असून चौथा सामना मेलबर्न येथे २६ डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे.

ब्रिस्बेन कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय संघावर ‘फॉलोऑन’ची नामुष्की ओढवणार असे वाटत असतानाच आकाश दीप (४४ चेंडूंत ३१) आणि जसप्रीत बुमरा (३८ चेंडूंत नाबाद १०) यांनी ऑस्ट्रेलियाच्या दर्जेदार गोलंदाजांचा कडवा प्रतिकार केला. त्यामुळे भारताचा ‘फॉलोऑन’ टळला आणि हा सामना अनिर्णित राहणार हे जवळपास निश्चित झाले होते. पाचव्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे केवळ २२ षटकांचा खेळ शक्य झाल्यानंतर निकालावर शिक्कामोर्तब झाले.

हेही वाचा : महाराष्ट्राच्या १६ वर्षीय शौर्या अंबुरेची अभिमानास्पद कामगिरी, राष्ट्रीय स्पर्धेत अडथळा शर्यतीत पटकावले सुवर्णपदक

अखेरच्या दिवशी अवघ्या चार षटकांतच भारताची अखेरची जोडी मोडीत काढत ऑस्ट्रेलियाने १८५ धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर त्यांनी आक्रमक शैलीत फलंदाजी करताना विजयासाठी प्रयत्न केले. मात्र, फटकेबाजीच्या नादात ऑस्ट्रेलियाने झटपट गडी गमावले. केवळ १८ षटके फलंदाजी केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने ७ बाद ८९ धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला आणि भारतासमोर ५४ षटकांत २७५ धावांचे आव्हान ठेवले. मात्र, भारताच्या डावातील केवळ २.१ षटके झाल्यावर अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबविण्यात आला. त्यानंतर पावसालाही सुरुवात झाली. संततधार कायम राहिल्याने पंचांनी अखेरीस सामना समाप्तीचा निर्णय घेतला.

पहिले चार दिवस पावसाने वारंवार अडथळा आणल्याने खेळपट्टी आच्छादित ठेवण्यात आली होती. याचा खेळपट्टीवर मोठा परिणाम झाला. खेळपट्टीला भेगा पडल्या, शिवाय चेंडू कधी खूप उसळी घेत होता, तर कधी खाली राहत होता. याचा भारतीय गोलंदाजांना फायदा झाला.

हेही वाचा : R Ashwin Net Worth: ९ कोटींचं घर, मीडिया कंपनी, लग्झरी कार…, १०० कोटींपेक्षा जास्त आहे अश्विनची एकूण संपत्ती

‘डब्ल्यूटीसी’मध्ये तिसऱ्या स्थानीच

ब्रिस्बेन कसोटी अनिर्णित राहिल्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठीची चुरस कायम राहिली आहे. भारतीय संघ ‘डब्ल्यूटीसी’च्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी कायम असून त्यांची गुणांची टक्केवारी ५५.८८ अशी आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ ५८.८९ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका ६३.३३ टक्क्यांसह अग्रस्थानी कायम आहे. मात्र, भारताची ही अखेरची मालिका असून दक्षिण आफ्रिका (पाकिस्तानविरुद्ध) आणि ऑस्ट्रेलिया (श्रीलंकेविरुद्ध) यांना आणखी एकेक कसोटी मालिका खेळण्याची संधी मिळणार आहे.

WTC Points Table: गाबा कसोटी ड्रॉ झाल्यानंतर WTC गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी? कसं आहे भारताचं फायनलसाठी समीकरण?

संक्षिप्त धावफलक

● ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ४४५

● भारत (पहिला डाव) : ७८.५ षटकांत सर्व बाद २६० (केएल राहुल ८४, रवींद्र जडेजा ७७; पॅट कमिन्स ४/८१, मिचेल स्टार्क ३/८३)

● ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : १८ षटकांत ७ बाद ८९ घोषित (पॅट कमिन्स २२, अॅलेक्स कॅरी नाबाद २०; जसप्रीत बुमरा ३/१८, आकाश दीप २/२८, मोहम्मद सिराज २/३६)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● भारत (दुसरा डाव) : २.१ षटकांत बिनबाद ८ (केएल राहुल नाबाद ४, यशस्वी जैस्वाल नाबाद ४)