धावांची भूक किती असावी आणि ती कशी शमवावी, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथकडे पाहता येईल. चौथ्या कसोटीत चौथे दमदार शतक लगावत स्मिथने कर्णधाराला साजेशी खेळी साकारली आणि ऑस्ट्रेलियाला सामन्यामध्ये वर्चस्व मिळवून दिले. स्मिथचे शतक आणि वॉटसन, शॉन मार्श आणि जो बर्न्स यांच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिला डाव ५७२ धावांवर घोषित केला. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची दुसऱ्या दिवसअखेर १ बाद ७१ अशी स्थिती आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी स्मिथ आणि वॉटसन यांनी संयत सुरुवात केली. पण स्थिरस्थावर झाल्यावर स्मिथने पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांवर चौफेर हल्ला सुरू केला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १९६ धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला सुस्थितीत नेले. ऑस्ट्रेलियाने चारशे धावांचा टप्पा ओलांडला आणि त्यानंतर लगेचच त्यांना वॉटसनला गमवावे लागले. आखूड चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात वॉटसन ‘मिड विकेट’ला झेलबाद झाला. वॉटसनने सात चौकारांच्या जोरावर ८१ धावा फटकावल्या. वॉटसन बाद झाल्यावर काही मिनिटांमध्येच स्मिथला बाद करत उमेश यादवने भारताला मोठे यश मिळवून दिले. दोन्ही स्थिस्थावर झालेले फलंदाज एकामागून एक बाद झाल्यावर भारताकडे सामन्यामध्ये दुसऱ्यांदा वरचष्मा मिळवण्याची संधी आली होती, पण त्यांनी ती पुन्हा एकदा गमावली. आर. अश्विनच्या गोलंदाजीवर मार्शचा सोपा झेल दुसऱ्या स्लिपमध्ये मुरली विजयने सोडला, त्यावेळी मार्श ९ धावांवर होता. त्यानंतर मार्शने ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ७३ धावा फटकावल्या, त्याचबरोबर बर्न्सबरोबर पाचव्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी रचली. बर्न्सनेही यावेळी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले, त्याने १० चौकारांच्या जोरावर ५८ धावा फटकावल्या. हे दोघे बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या बॅड्र हॅडिनने (नाबाद ९) पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार लगावला. तर रायन हॅरीसने (२५) भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीचा समाचार घेत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या फुगवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. हॅरीस बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाने डाव घोषित केला. भारताकडून मोहम्मद शमीने पाच विकेट्स घेण्याची किमया यावेळी साधली, पण त्यासाठी त्याला ११२ धावा मोजाव्या लागल्या.
ऑस्ट्रेलियाच्या धावांचा पाठलाग करताना भारताला तिसऱ्याच चेंडूवर सलामीवीर मुरली विजयला खाते न उघडताच गमवावे लागले. पण त्यानंतर रोहित शर्मा (खेळत आहे ४०) आणि लोकेश राहुल (खेळत आहे ३१) यांनी ७१ धावांची भागीदारी रचत दिवस खेळून काढण्याची जबाबदारी पार
पाडली.
स्मिथची विक्रमाशी बरोबरी
सलग चार कसोटीत शतक झळकावण्याच्या सर डॉन ब्रॅडमन आणि जॅक कॅलिस यांच्या विक्रमाची स्टिव्हन स्मिथने बरोबरी केली. अॅडलेड, ब्रिस्बेन, मेलबर्न आणि सिडनीत शतक झळकावत स्मिथने या विक्रमाची बरोबरी केली.
स्टिव्हन स्मिथ
धावा ११७
चेंडू २०८
चौकार १५
धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ख्रिस रॉजर्स त्रि.गो. शमी ९५, डेव्हिड वॉर्नर झे. विजय गो. अश्विन १०१, शेन वॉटसन झे. अश्विन गो. शमी ८१, स्टिव्हन स्मिथ झे. साहा गो. यादव ११७, शॉन मार्श झे. साहा गो. शमी ७३, जो बर्न्स झे. राहुल गो. शमी ५८, ब्रॅड हॅडिन नाबाद ९, रायन हॅरीस झे. अश्विन गो. शमी २५, अवांतर (लेग बाइज ६, वाइड ७) १३, एकूण १५२.३ षटकांत ७ बाद ५७२.बाद क्रम : १- २००, २- २०४, ३-४००, ४-४१५, ५-५२९, ६-५४६, ७-५७२. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ३४-५-१२२-०, उमेश यादव २७-५-१३७-१, मोहम्मद शमी २८.३-३-११२-५, आर. अश्विन ४७-८-१४२-१, सुरेश रैना १६-३-५३-०.
भारत (पहिला डाव) : मुरली विजय झे. हॅडीन गो. स्टार्क ०, लोकेश राहुल खेळत आहे ३१, रोहित शर्मा खेळत आहे ४०, अवांतर ०, एकूण २५ षटकांत १ बाद ७१. बाद क्रम : १-०. गोलंदाजी : मिचेल स्टार्क ६-२-१७-१, रायन हॅरीस ७-१-१७-०, जोश हॅझेलवूड ४-१-१०-०, नॅथन लिऑन ८-१-२७-०.
