भारताविरूद्धच्या पहिल्या टी २० सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला. भारताने दिलेले १४९ धावांचे आव्हान अनुभवी मुश्फिकुर रहीमच्या तडाखेबाज अर्धशतकाच्या बळावर बांगलादेशने सहज पूर्ण केले. या विजयासह बांगलादेशने भारताविरूद्ध टी २० इतिहासातील पहिला सामना जिंकला. या आधीच्या ८ सामन्यात भारताने बांगलादेशला धूळ चारली होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सामन्यात १० व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक घटना घडली. युझवेंद्र चहल गोलंदाजी करत असताना चेंडू फलंदाजाच्या बॅटच्या अगदी जवळून गेला. चेंडू बॅटला लागला की नाही हे गोलंदाज आणि कर्णधार रोहित शर्मा यांना समजले नाही. त्यामुळे यष्टीरक्षक ऋषभ पंतचा सल्ला घेण्यात आला. पंत DRS घेण्याचा सल्ला दिला, पण अखेर चेंडू बॅटला लागला नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे भारताचा रिव्ह्यू वाया गेला. या घटनेमुळे रोहितने ऋषभला पाहून चक्क कपाळावर हात मारून घेतला.

दरम्यान, १४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरूवात काहीशी खराब झाली होती. लिटन दास (७) आणि मोहम्मद नईम (२६) लवकर बाद झाले. काही वेळाने खेळपट्टीवर स्थिरावलेला सौम्या सरकारही ३९ धावांवर त्रिफळाचीत झाला. त्यामुळे भारत सामना जिंकणार अशी आशा चाहत्यांना होती. पण मुश्फिकुर रहीम सामन्याचा सगळा भार आपल्या खांद्यावर घेत तडाखेबाज नाबाद ६० धावा केल्या आणि बांगलादेशला पहिला विजय मिळवून दिला.

त्याआधी, पहिल्या डावात भारताचा कर्णधार रोहित शर्मा (९), लोकेश राहुल (१५), श्रेयस अय्यर (२२) झटपट बाद झाले. शिखर धवन आणि ऋषभ पंत यांच्यात चांगली भागीदारी होत असतानाच मैदानात त्या दोघांमध्ये धाव घेण्यावरून गोंधळ झाला. त्यामुळे शिखर धवन धावबाद झाला. धवनने ३ चौकार आणि १ षटकार लगावत ४२ चेंडूत ४१ धावा केल्या. पदार्पणाचा सामना खेळणारा मुंबईकर शिवम दुबेही एक धाव करून बाद झाला. पाठोपाठ दिल्लीकर ऋषभ पंतही २७ धावांवर माघारी परतला. शेवटच्या टप्प्यात क्रुणाल पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर भारताने २० षटकात ६ बाद १४८ पर्यंत मजल मारली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs bangladesh video rohit sharma facepalms himself gives hilarious reaction to rishabh pant after drs howler vjb
First published on: 04-11-2019 at 12:39 IST