England vs India 1st Test : भारत-इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीत इंग्लंडने भारतावर सामन्याच्या चौथ्या दिवशी ३१ धावांनी विजय मिळवला. १९४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव १६२ धावांवर आटोपला. या विजयासह इंग्लंडने ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात विराट कोहलीने झुंजार अर्धशतकी खेळी केली. हार्दिक पांड्यानेही काही काळ झुंज दिली. पण अखेर भारताच्या पदरी निराशा आली. बेन स्टोक्सने ४, अँडरसन आणि ब्रॉडने २-२, तर कुरान आणि रशीदने १-१ बळी टिपला. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या सॅम कुरानला सामनावीर घोषित करण्यात आले.

विराट कोहली आणि दिनेश कार्तिक यांनी आज दिवसाच्या खेळाला सुरुवात केली होती. पण पहिल्याच षटकात भारताला धक्का बसला आणि दिनेश कार्तिक २० धावांवर बाद झाला. कर्णधार कोहलीने झुंजार अर्धशतक ठोकले पण नंतर लगेच बेन स्टोक्सने त्याला पायचीत केले. कोहलीने ९३ चेंडूत ५१ धावा केल्या. त्याच षटकात मोहम्मद शमीदेखील बाद झाला. फिरकीपटू आदिल रशीद याने इशांत शर्माला (११) पायचीत केले. फिरकीपटू आदिल रशीद याने इशांत शर्माला पायचीत केले. हार्दिक पांड्याने काही काळ झुंज देत ६१ चेंडूत ३१ धावा केल्या. पण अखेर बेन स्टोक्सने त्याला झेलबाद केले आणि डावातील चौथा गडी टिपत सामना आपल्या संघाला जिंकवून दिला.

त्याआधी तिसऱ्या दिवसअखेर भारत इंग्लंड कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर भारताने ५ बाद ११० धावांपर्यंत मजल मारली होती. तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीला भारताला इंग्लंडचे ३ गडी बाद करायचे होते. या दरम्यान, तळाच्या सॅम कुर्रान या फलंदाजाने अप्रतिम फटकेबाजी करून आपले अर्धशतक (६३) साजरे केले. त्याच्या या खेळाच्या बळावर इंग्लंडने १८० धावांपर्यंत मजल मारली आणि भारतापुढे १९४ धावांचे लक्ष्य ठेवले. त्यांनतर भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात काहीशी निराशाजनक झाली. मुरली विजय (६), शिखर धवन (१३), लोकेश राहुल (१३), अजिंक्य रहाणे (२) आणि रविचंद्रन अश्विन (१३) या पाच खेळाडूंना फार काळ खेळपट्टीवर तग धरता आले नाही. दिनेश कार्तिकने कर्णधार कोहलीला साथ दिली आणि दिवसाचा खेळ संपेपर्यंत टिकून फलंदाजी केली.

इंग्लंडचा दुसरा डाव सर्वबाद १८० धावांवर आटोपला होता. पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात आजच्या दिवसात झटपट ६ गडी गमावल्यानंतर अखेर इंग्लंडच्या डावाला स्थैर्य आले होते. तळाचे फलंदाज आदिल रशीद आणि सॅम कुर्रान यांनी डावाला आकार दिला. कुर्रानने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लडने १८० धावांपर्यंत मजल मारली. तर या डावात इशांत शर्माने ५, अश्विनने ३ आणि उमेश यादवने २ गडी बाद केले.

तत्पूर्वी, भारताचा डाव सर्वबाद २७४ धावात आटोपला. एका वेळी बलाढ्य वाटणाऱ्या २८७ धावांचा पाठलाग करताना विराटने अप्रतिम १४९ धावांची खेळी केली. ‘साहेबां’च्या भूमीवर त्याने पहिले आणि कारकिर्दीतील २२वे शतक ठोकले. त्याला उमेश यादवने १६ चेंडूत नाबाद १ धाव, तर इशांत शर्माने १७ चेंडूत ५ धावा काढत त्याला चांगली साथ दिली. याशिवाय, इतर फलंदाज आपला प्रभाव पडू शकले नाहीत. इंग्लंडतर्फे कुर्रानने ४ तर रशीद, स्टोक्स आणि अँडरसनने २-२ गडी बाद केले.