कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या दोन फिरकीपटूंनी भारतीय संघात आपलं स्थान पक्क केलं आहे. वन-डे आणि टी-२० क्रिकेटमध्ये दोन्ही गोलंदाजांनी केलेली कामगिरी पाहता कसोटी क्रिकेटमध्ये रविचंद्रन आश्विन आणि रविंद्र जाडेजा यांना कुलदीप-चहल जोडी पर्याय ठरेल असा अंदाज सर्वांनी व्यक्त केला होता. मात्र इंग्लंड दौऱ्यात फिरकीपटूंसाठी अनुकूल नसलेल्या खेळपट्टीवर चांगली कामगिरी करत आश्विनने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. त्याच्या याच कामगिरीवर इंग्लंडचा माजी फिरकीपटू ग्रॅम स्वॅन चांगलाच खूश झालेला आहे. आश्विन हा कसोटी क्रिकेटमधला सर्वोत्कृष्ट ऑफस्पिनर असल्याचं वक्तव्य स्वॅनने केलं आहे.

अवश्य वाचा – व्यवसायिक दृष्टीकोनामुळे क्रिकेटचा दर्जा खालावतोय – विराट कोहली

“सध्याच्या घडीला कसोटी क्रिकेटमध्ये रविचंद्रन आश्विन सर्वोत्तम ऑफस्पिनर गोलंदाज आहे. भारतीय उपखंडात त्याने केलेली कामगिरी ही अविश्वसनीय आहे, याचसोबत पहिल्या कसोटीत त्याने केलेल्या गोलंदाजीमुळे मी अवाक झालो होतो. घरच्या मैदानासोबत इंग्लंडमध्येही आश्विन आपली कामगिरी चोख बजावतो आहे. यासाठी माझ्यादृष्टीने कसोटी क्रिकेटमध्ये आताच्या घडीला आश्विन सर्वोत्तम फिरकीपटू आहे.” टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत स्वॅन बोलत होता.

या मुलाखतीत स्वॅनने अफगाणिस्तानचा युवा गोलंदाज राशिद खानचंही कौतुक केलं. मर्यादीत षटकांच्या सामन्यात राशिद सर्वप्रकारचे चेंडू टाकतो. त्याच्या गोलंदाजीत गती आहे, तो चेंडू चांगले वळवतोही, त्यामुळे राशिदला सध्या कोणत्याही खेळाडूकडून स्पर्धा नसल्याचं स्वॅन म्हणाला. सध्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने मागे आहे. त्यामुळे उरलेल्या कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवश्य वाचा – Ind vs Eng : मोहम्मद शामीची अँडरसनवर स्तुतीसुमने