India vs England 1st Test: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २० जूनपासून लीड्समध्ये रंगणार आहे. या सामन्यात ८ वर्षांनंतर कसोटी संघात कमबॅक करत असलेल्या करूण नायरला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, सामन्याआधीच करूण नायरबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. नेट्समध्ये सराव करत असताना करूण नायर प्रसिद्ध कृष्णाचा चेंडू लागून दुखापतग्रस्त झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
पहिल्या सामन्याला मुकणार?
तर झाले असे की, १८ जूनला भारतीय संघाचा सराव सुरू असताना करूण नायर नेट्समध्ये फलंदाजी करत होता. त्यावेळी प्रसिद्ध कृष्णा गोलंदाजी करत होता. प्रसिद्ध कृष्णाने वेगवान शॉर्ट चेंडू टाकला. नेट्समध्ये फलंदाजी करत असल्यामुळे करूण नायरला हा चेंडू व्यवस्थित टाईम करता आला नाही. त्यामुळे चेंडू त्याच्या पोटाला जाऊन लागला. चेंडू लागताच प्रसिद्ध कृष्णाने करूण नायरच्या दिशेने धाव घेत विचारपूस गेली. सुदैवाने करूण नायरला कुठलीही दुखापत झाली नाही. त्यामुळे तो पहिल्या सामन्यात खेळण्यासाठी उपलब्ध असणार आहे.
करूण नायरसाठी ही अतिशय महत्वाची असणार आहे. २०१७ मध्ये तिहेरी शतकी खेळी केल्यानंतर त्याला बरेच वर्ष संघाबाहेर राहावं लागलं आहे. आता ८ वर्षांनंतर त्याला भारतीय संघात कमबॅक करण्याची संधी मिळाली आहे. रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. त्यानंतर आयपीएल स्पर्धेत कमबॅक करण्याची संधी मिळताच त्याने पहिल्याच सामन्यात ९३ धावांची खेळी केली होती. त्यानंतर इंग्लंड लायन्स संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याने दुहेरी शतकी खेळी केली होती. हा फॉर्म पाहता त्याची इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. तसेच त्याला प्लेइंग ११ मध्ये देखील स्थान दिले जाऊ शकते.
करूण नायरचा रेकॉर्ड
करूण नायरच्या कसोटी क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर २०१६ मध्ये इंग्लंडविरूद्ध खेळताना त्याने नाबाद ३०३ धावांची खेळी केली होती. या खेळीनतंर तो एका रात्रीत स्टार झाला, पण काही महिन्यातच त्याची लोकप्रियता कमी झाली. २०१७ मध्ये त्याला ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळण्याची संधी मिळाली, या मालिकेतील ३ सामन्यांमध्ये त्याला अवघ्या ५३ धावा करता आल्या. त्यानंतर २०१८ इंग्लंड दौऱ्यावर त्याला बाकावर बसावं लागलं. मात्र त्याने माघार घेतली नाही. त्याने कमबॅक करण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले.अखेर २०२५ मध्ये त्याला भारतीय संघात कमबॅक करण्याची संधी मिळाली आहे. त्याने ६ कसोटी सामन्यांमध्ये ६२.३ च्या सरासरीने ३७४ धावा केल्या आहेत. यात एका त्रिशतकी खेळीचाही समावेश आहे.